पाचव्या स्वरयज्ञ महोत्सवाची सुरेल सांगता

पुणे, दि. ३ ऑक्टोबर : पद्मविभूषण विदुषी डॉ. एन्. राजम् यांच्या व्हायोलिनमधून आलेले भैरवीचे पवित्र सूर कानात साठवून रसिकश्रोते आपापल्या घरी परतले. येरवड्यातील एसएनबीपी विद्यालयाच्या सरस्वती सभागृहात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पाचव्या स्वरयज्ञ महोत्सवाची काल सांगता झाली. यावेळी पद्मश्री उल्हास कशाळकर, पं. मनमोहन कुंभारे, विदुषी विद्या भागवत, कथ्थक नर्तक मुल्ला अफसर खान, पं. सुरेश पत्की, एसएनबीपी संस्थेचे डॉ. डी. के. भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
आज महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरूवात बनारस व जयपूर घराण्याचे विख्यात कथ्थक नर्तक मुल्ला अफसर खान यांच्या प्रस्तुतीने झाली. त्यांनी आपल्या प्रस्तुतीची सुरूवात ‘शिवरुद्राष्टकम्’ या रचनेने केली. त्यानंतर ‘बसंत’ तालातील प्रस्तुतीमध्ये त्यांनी पारंपरिक तोडे, तुकडे आणि आमद सादर केली. ‘गुरू बिन ऐसे कौन करे’ हे गुरूभजन सादर केल्यानंतर ‘सरगम’ ही स्वरचित नृत्य रचना सादर करून त्यांनी आपल्या प्रस्तुतीची समाप्ती केली. वैदेही कुलकर्णी, श्रेया पट्टणी, शिल्पा धर्माधिकारी, सतीश सातारकर आणि गितांजली साळुंके या त्यांच्या शिष्यांनी त्यांच्यासोबत सहप्रस्तुती केली.
त्यानंतर जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका विदुषी विद्याताई भागवत यांचे स्वरमंचावर आगमन झाले. प्रथम सूर साधे या भूप रागातील विलंबित त्रितालातील ख्यालाने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरूवात केली. त्यानंतर त्यांच्या गुरू विदुषी किशोरी आमोणकर यांची सुप्रसिद्ध ‘सहेला रे’ ही मध्यलय अध्धा त्रितालातील बंदिश त्यांनी सादर केली. भूपाचे रंग दाखवताना अनेकवेळा त्यांच्या गाण्यातून किशोरी आमोणकरांची अनुभूती रसिकांना झाली. त्यानंतर किशोरी आमोणकरांनी संगीत दिलेला संत ज्ञानेश्वरांचा अभंग ‘पडिले दूरदेशी मन आठवे मानसी’ त्यांनी सादर केला आणि रसिकांची मने जिंकली. त्यांना विनायक गुरव यांनी तबल्यावर तर सारंग सांभारे यांनी हार्मोनियमवर योग्य साथ केली.
त्यानंतर विश्वविख्यात व्हायोलिनवादक पद्मविभूषण विदुषी डॉ. एन्. राजम् यांचे स्वरमंचावर आगमन झाले. विलंबित एकतालात जोग रागातील ख्यालाने त्यांनी आपल्या वादनाची सुरूवात केली. आपल्या वादनात गायकी अंगाचे बारकावे त्यांनी दाखवले. त्यानंतर दृत तीनतालातील ‘साजन मोरे घर आयो’ ही पारंपरिक बंदिश त्यांनी सादर केली. व त्यानंतर अतीदृत त्रितालातील एक बंदिश सादर केली. ख्याल सादर करतानाचा ठेहराव आणि दृत बंदिशींमधील लयकारीने त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यानंतर खास रसिकाग्रहास्तव ‘पायोजी मैंने रामरतन धन पायो’ हे लोकप्रिय भजन त्यांनी सादर केले. सर्वांत शेवटी त्यांनी भैरवीतील एक बंदिश सादर केली. भैरवीच्या सुरूवातीला त्यांनी खर्जातील केलेले आलाप विशेष लक्षवेधी ठरले. त्यांच्यासोबत त्यांची नात नंदिनी शंकर यांनी व्हायोलिन सहवादनाची साथ केली. आघाडीचे युवा तबलावादक ओजस अढिया यांनी तबला साथ कली. अढिया यांच्या तबलावादनाचे रसिकांनी विशेष कौतुक केले. राजम् यांच्या वादनातील वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यास समर्पक अशी तबलासाथ रसिकांच्या विशेष स्मरणात राहिली.
दरम्यान कालच्या पहिल्या दिवशी (२ ऑक्टोबर) सायं. ५-३० वाजता महोत्सवाचे उद्घाटन झाले. यावेळी पद्मश्री व्यंकटेश कुमार, पं. राजेंद्र कंदलगावकर, पं. राजेंद्र कुलकर्णी, पं. मनमोहन कुंभारे, डॉ. सुधांशु कुलकर्णी, डॉ. बिपुलकुमार रे, पं. प्रमोद गायकवाड, संस्थेचे संचालक डॉ. डी. के. भोसले यांच्यासह अनेक मान्यवर व कलाकार उपस्थित होते. महोत्सवाची सुरूवात विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या प्रस्तुतीने झाली. इयत्ता पहिले ते आठवीच्या जवळपास ४० विद्यार्थी मुला-मुलींनी शास्त्रीय सहगायन व वादन केले. विदुषी प्रभा अत्रे यांच्या ‘तन मन धन तोपे वारू’ ही कलावती रागातील बंदिश मुलांनी सादर केली. त्यानंतर ‘कैसी ये धूम मचाई’ ही होरी सादर करून त्यांनी रसिकांची मने जिंकली.
संतूरमध्ये डॉक्टरेट केलेले युवा संतूरवादक डॉ. बिपुलकुमार रे यांचे त्यानंतर स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी समयानुकूल ‘राग मारवा’ प्रस्तुत करून वातावरण संतूरच्या सुरांनी भारावून टाकले. त्यानंतर ‘काश्मिरी धुन’ वाजवून त्यांनी विशेष रंगत आणली. त्यांना पं. मनमोहन कुंभारे यांनी समर्पक तबलासाथ केली.
त्यानंतर पद्मश्री पं. व्यंकटेश कुमार यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी जोग रागात विलंबित एकतालात ख्याल सादर केला. ग्वाल्हेर आणि किराणा घराण्याची वैशिष्ट्ये त्यांच्या गाण्यातून रसिकांना अनुभवता आली. त्यानंतर जोग रागातील पारंपरिक बंदिश ‘साजन मोरे घर आयो’ सादर करताना पेचदार ताना आणि लयकारी अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने सादर त्यांनी सादर केली. यावेळी त्यांनी घेतलेल्या सरगम तानाही वाहवा घेऊन गेल्या. त्यानंतर रसिकांकडून आलेली फर्माईश म्हणून दुर्गा रागातील ‘माता भवानी काली’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर दुर्गा रागातीलच एक अतिदृत तीनतालातील तराणा सादर करत रसिकांची मने जिंकली. संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. डी. के. भोसले यांच्या विनंतीला मान देताना ‘केदारगौळा’ रागातील ‘तोरेदु जीविसबहुदे हरि निन्न’ हे कन्नड भजन त्यांनी सादर केले आणि संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले. त्यानंतर संत कबीरांची एक भैरवी रागातील स्वरचित रचना ‘समझावन कोई नहीं अपना’ या प्रस्तुतीने महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता झाली.
सर्वच कलाकारांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळेमध्ये असा उपक्रम घेतल्याचे मनसोक्त कौतुक केले. पाच ते पंधरा या वयातच मुलांवर खरे कलेचे संस्कार होतात. त्यामुळे एसएनबीपी शाळेचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. आणि इतर शाळांनीही याचे अनुकरण करावे असे आवर्जून सांगितले. तसेच या महोत्सवाच्या आयोजनासाठी संस्थेचे आभार मानले. एसएनबीपी येरवडा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रश्मी शुक्ला, तबला शिक्षक विनायक गुरव यांच्यासह शाळेच्या सर्व कर्मचारी वर्गाने महोत्सावासाठी परिश्रम केले.

