देशी गोवंशाचे संवर्धन काळाची आवश्यकता : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांची समृद्धी आणि कृषी शिक्षण, संशोधन व नाविन्याला चालना

नागपूर, दि. 12 नोव्हेंबर : रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नागपूर येथे लोकनेते स्व. दत्ता मेघे यांच्या स्मारकाचे अनावरण, नंदकिशोर जयस्वाल कृषी महाविद्यालय, शालिनीताई दत्ता मेघे पशुवैद्यकीय रुग्णालय व स्व. श्री. दत्ताजी मेघे स्मृती दालनाचा लोकार्पण सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले, स्व. दत्ता मेघे यांनी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या माध्यमातून गरीब, वंचित आणि बहुजन घटकांसाठी मोलाचे कार्य केले. स्वतःच्या परिश्रमातून उभ्या केलेल्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी समाजाला भरभरून देण्याचे काम केले. त्यांनी पाहिलेले शैक्षणिक विस्ताराचे स्वप्न संपूर्ण मेघे कुटुंबियांनी गुणवत्ता व लोकाभिमुखतेची सांगड घालत पुढे नेले आहे.

हवामान बदलाचा सर्वाधिक परिणाम शेती क्षेत्रावर होत असून, बदलत्या परिस्थितीचा सामना करु शकणारी पिके विकसित करणे, कमी पाण्यात अधिक उत्पादकता साधणे आणि कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व संशोधनाला चालना देणे ही काळाची गरज आहे. यासाठी कृषी क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोन असलेल्या, कौशल्यपूर्ण आणि संशोधनाभिमुख मनुष्यबळ निर्माण करणाऱ्या दर्जेदार कृषी शिक्षण संस्थांची आवश्यकता असून रामटेकमध्ये उत्तम प्रकारचे कृषी महाविद्यालय उभारण्यात आल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

शेतीसोबत पशुपालन हा शेतकऱ्यांच्या आर्थिक समृद्धीचा महत्त्वाचा आधार आहे. देशी गाई केवळ दुग्धोत्पादनासाठीच नव्हे, तर संपूर्ण शेतीच्या परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक आहेत. देशी गोवंशाचे संवर्धन, पशुधनाचे आरोग्य, आधुनिक उपचारपद्धती आणि संशोधनाच्या माध्यमातून पशुपालकांना अधिक सक्षम करणे आवश्यक आहे. रामटेक येथे सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या माध्यमातून पशुसंवर्धन क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन आणि नवनवीन उपचार पद्धतींना चालना मिळून पशुधनाचे संवर्धन तसेच पशुपालकांचे हित साधण्यास मदत होईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

रामटेकच्या सर्वांगीण विकासात योगदान देणाऱ्या नंदकिशोर जयस्वाल यांच्या नावाने कृषी महाविद्यालय सुरू करणे ही त्यांच्या कार्याचा गौरव करणारी बाब आहे. तसेच, नव्या संस्थांच्या माध्यमातून उत्तम पदवीधर, संशोधक आणि कुशल मनुष्यबळ निर्माण होऊन कृषी व पशुसंवर्धन क्षेत्राला नवी दिशा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *