अहिल्यानगरमध्ये ‘संघ शताब्दी संवाद’

अहिल्यानगर, 25 एप्रिल : व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मूळ गाभा आहे. डॉ. हेडगेवारांनी मांडलेली हिंदुराष्ट्र संकल्पना आणि संघ विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या ३७ हून अधिक संघटना आज राष्ट्रउभारणीत मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर यांनी केले. अहिल्यानगर येथील पटेल मंगल कार्यालय येथे आयोजित ‘संघ शताब्दी संवाद’ कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. समाजातील सज्जन शक्तीला संघटित करणे आणि संघकार्याची ओळख करून देणे या उद्देशाने या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य राष्ट्र उभारणीचे एक निरंतर चालणारे अभियान आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. डॉ. हेडगेवारांनी प्रतिकूल परिस्थितीत लावलेले हे विचारांचे रोपटे आज जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना बनले आहे, ज्याचा मूळ उद्देश चारित्र्यसंपन्न नागरिक घडवणे हाच आहे. संघाच्या शताब्दी वर्षाकडे वाटचाल करताना समाजातील प्रत्येक घटकाला राष्ट्रकार्याशी जोडणे हे आपले प्रमुख कर्तव्य असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हिंदुराष्ट्र ही संकल्पना संकुचित नसून ती सर्वांना सामावून घेणारी आणि वसुधैव कुटुंबकम मानणारी एक व्यापक जीवनपद्धती आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
संघाशी संबंधित असलेल्या ३७ विविध संघटना आज शिक्षण, सेवा, ग्रामीण विकास आणि कामगार क्षेत्रात अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. यावेळी प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीपराव क्षीरसागर यांनी ‘पंचपरिवर्तन’ विषयावर सविस्तर भाष्य केले. “स्वभाषा, स्वभूषा, स्वदेश, स्वभोजन आणि स्वभजन हे स्वबोधाचे मुद्दे आपल्या जगण्याचा आधार असले पाहिजेत. समरसता हा भारतीयांचा स्थायी भाव असून, आपली संस्कृती आणि सण-वार नेहमीच पर्यावरण पूरक राहिले आहेत. पर्यावरण रक्षण हा आपल्या डीएनएमध्येच (DNA) आहे, असे ते म्हणाले.

