
मुंबई, दि. 9 जून : अवघ्या 25 वर्षांच्या आयुष्यात जननायक, भगवान बिरसा मुंडा यांनी इंग्रजांविरुद्ध संघर्षाची अशी ज्योत पेटवली की संपूर्ण ब्रिटिश राजवट हादरून गेली. जल, जमीन आणि जंगलांसाठी तसेच आदिवासी अस्मितेच्या रक्षणासाठी त्यांनी उभारलेला लढा केवळ झारखंड-बिहारपुरता मर्यादित राहिला नाही, तर संपूर्ण देशभरातील आदिवासी समाजाला प्रेरणा देणारा ठरला अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज लोकभवन, मुंबई येथे जननायक, ‘धरती आबा’ भगवान बिरसा मुंडा यांच्या बलिदान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अभिवादन केले. त्यावेळी फडणवीस बोलत होते.
स्वातंत्र्यलढ्यातील आदिवासी नायक-नायिकांचे योगदान अनन्यसाधारण असूनही इतिहासाने त्यांची दखल घेतली नव्हती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे या वीरांचा गौरवशाली इतिहास देशासमोर आला आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचू लागला. आदिवासी संस्कृतीतील निसर्गसंवर्धन, समता आणि समृद्ध समाजव्यवस्था ही आजही प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

आदिवासी संस्कृतीचे जतन आणि या समाजाचे सक्षमीकरण ही सरकारची जबाबदारी आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार तसेच विविध कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून सक्षम आदिवासी समाज घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. भगवान बिरसा मुंडा हेच या सर्व कार्यामागील प्रेरणास्थान आहेत, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री डॉ. अशोक उईके, मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री इंद्रनील नाईक व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 19व्या शतकातील जननायक असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांनी “अबुआ राज एते जाना, महारानी राज टुंडू जाना” असा एल्गार देत ब्रिटिश सत्तेविरुद्ध आदिवासी समाजाला एकत्र आणले. त्यांच्या नेतृत्वाखाली आदिवासींनी अन्यायाविरोधात उभारलेला संघर्ष इतिहासात अजरामर झाला. ब्रिटिशांनी त्यांना अटक करून छळ केला आणि 9 जून 1900 रोजी कारागृहात त्यांचे निधन झाले. मात्र, केवळ 25 वर्षांचे आयुष्य जगूनही ते अमर झाले.

शिंदे पुढे बोलताना म्हणाले, आदिवासींच्या हक्कांसाठी आता कायद्यांमध्ये आवश्यक बदल करण्यात आले आहेत. आदिवासी संस्कृती, कला, लोकपरंपरा आणि उत्सवांचे जतन व संवर्धन करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आश्रमशाळा स्मार्ट करण्याचे काम सुरू असून त्यांना उच्च शिक्षणाशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मेडिकल व अभियांत्रिकी प्रवेशासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पीएचडी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती तसेच परदेशातील उच्च शिक्षणासाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात विकासाची गंगा पोहोचविण्याचे काम सुरू असून उद्योग आणि गुंतवणूक वाढवून हजारो-लाखो आदिवासी युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

