आरोग्य भारतीकडून पुण्यात वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा

आरोग्य भारतीच्या तीर्थक्षेत्र आरोग्य सेवा उपक्रमांतर्गत कसबा विभागाचे वारकरी आरोग्य सेवा शिबिर संपन्न

पुणे, दि. 10 जुलै : पुण्यात विसावलेल्या पालखीतील वारकऱ्यांची वैद्यकीय सेवा करण्याच्या उद्देशाने आरोग्य भारतीतर्फे आरोग्य सेवा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दि. 10 जुलै रोजी सकाळी 8 ते दुपारी 1 या वेळेत आरोग्य भारतीच्या तीर्थक्षेत्र आरोग्य सेवा उपक्रम अंतर्गत श्री ओंकारेश्वर मंदिर, शनिवार पेठ, पुणे येथे हे शिबिर पार पडले. आरोग्य भारतीच्या कसबा विभागाने या शिबिराचे आयोजन केले होते.

या सेवा शिबिराची सुरूवात श्री धन्वंतरी आणि भारतमाता पूजनाने झाली. त्यानंतर सर्वांनी सामुहिक श्री धन्वंतरी स्तोत्र स्तवन केले. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथील आजरेकर महाराज दिंडीतील ह.भ.प. आजरेकर महाराज,  ह.भ.प. संदीप महाराज कोंडकर, ह.भ.प. तानाजी महाराज पाटील, आरोग्य भारतीचे पश्चि महाराष्ट्र प्रांत अध्यक्ष डाॅ. विनायक कुलकर्णी, उपाध्यक्ष डाॅ. गिरिष कामत, सचिव डाॅ. संतोष गटणे, श्री ॐकारेश्वर देवस्थानचे कार्यकारी विश्वस्त धनोत्तम लोणकर, हरी परशुराम औषधालय संस्थेचे विश्वस्त वैद्य विनायक खडीवाले व संगिता खडीवाले, भारती विद्यापीठाच्या विभाग प्रमुख डॉ. वर्षा वैद्य, डॉ. शिल्पा एक्के, सेवांकुर भारत संस्थेच्या डॉ. प्राची माणकेश्वर व डॉ. वैष्णवी जाधव तसेच रा.स्व.संघाच्या कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

शिबिरात उपस्थित सर्व वारकऱ्यांचे प्रथम केस पेपर तयार करून यादीमध्ये नोंदणी करण्यात आली. त्यानंतर सर्व वारकऱ्यांची त्यांना होणाऱ्या त्रासानुसार विभागणी करून रक्त दाब तपासणी करुन तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात पायाचे दुखणे, सर्दी, खोकला, पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, थंडी-ताप, पाय मुरगळणे इत्यादीसाठी तपासणी आणि मार्गदर्शन करण्यात आले. डाॅ. गिरिष कामत, डाॅ. शुभदा कामत, डाॅ. अजय शहा आणि सहकार्यांनी आवश्यकतेनुसार कफ सिरप, वेदनाशामक औषधे, ORS सप्लीमेंट्स, विशेषतः औषधी तेल, वेदनाशामक मलम, इत्यादी औषधे दिली.

विशेष म्हणजे यावेळी सेवांकुर भारत संस्थेच्या डाॅ. प्राची माणकेश्वर, डाॅ. सोनाली खंडाळीकर आणि त्यांच्या सहकार्यांनी आयुर्वेदीक तेलाने वारकऱ्यांची चरणसेवा केली. या चरणसेवेमुळे अनेक वारकरी अतिशय सुखावले होते. या चरणसेवेसाठी ईर्जिक या सेंद्रीय शेती उत्पादन निर्मितीमध्ये काम करणाऱ्या संस्थेकडुन तिळाचे तेल विनामूल्य उपलब्ध करुन दिले गेले. डाॅ वैष्णवी जाधव आणि भारती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांना काही व्यायाम आणि विशिष्ठ शारीरिक हालचालींतुन वेदना मुक्तीसाठी मार्गदर्शन केले.

या शिबिरामध्ये एकूण 411 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच फलटण येथील एका दिंडीतील 100 वारकऱ्यांसाठी औषधांचे किट देण्यात आले. या आरोग्य सेवेसाठी बी जे वैद्यकीय महाविद्यालय, सेवांकुर भारत, भारती विद्यापीठ काॅलेज, भारती विद्यापीठ फिजिओथेरपी काॅलेज, काशीबाई नवले दंत महाविद्यालय यांमधील डॉक्टर्स, इंटर्न्स व सोशल वर्कर्स मिळून एकंदर 60 जणांनी आरोग्य सेवेचे काम पार पाडले. डाॅ. प्रज्ञा अक्कलकोटकर यांनी एक्यूपंक्चरच्या माध्यमातून वारकऱ्यांवर उपचार केले. एकुण 55 कार्यकर्ते विविध व्यवस्था विभागात कार्यरत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *