‘DINK’ संस्कृती कुटुंबव्यवस्थेसाठी धोक्याची घंटा : ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे 

नाशिकमध्ये धर्माचार्य परिषद

नाशिक, 27 एप्रिल : शहरी जीवनशैलीत वाढत चाललेली ‘DINK’ (Double Income No Kids) संस्कृती ही कुटुंबव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. एकत्र कुटुंब पद्धती आणि घरातील सदस्यांनी एकत्र बसून केलेले भोजन हे संवादाचे सर्वात प्रभावी माध्यम आहे. बदलत्या काळात आपली कौटुंबिक मूल्ये जपली गेली, तरच राष्ट्र बलशाली होईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. शिवाजी महाराज मोरे यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नाशिकमध्ये आयोजित ‘धर्माचार्य परिषदे’त प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. द्वारका परिसरातील इस्कॉन मंदिर येथे रविवारी परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध क्षेत्रांतील धर्माचार्य आणि मान्यवर उपस्थित होते.

महाराजांनी आपल्या मार्गदर्शनात ‘पंच परिवर्तन’ या संकल्पनेवर सखोल भाष्य केले. प्रामुख्याने कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता आणि पर्यावरण या विषयांवर त्यांनी भर दिला. समरसतेचे महत्त्व अधोरेखित करताना ते म्हणाले, वारकरी संप्रदायाने आपल्याला भेदातीत समाजाची शिकवण दिली आहे. दूध आणि पाणी एकदा एकत्र झाले की त्यांना वेगळे करता येत नाही, तशीच एकी समाजात निर्माण होणे आवश्यक आहे.
कोविड काळात निसर्गाच्या सानिध्यात असलेली गावे अधिक सुरक्षित होती. झाडे हीच मानवाची खरी रक्षक आहेत, हे आपण विसरता कामा नये, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक नागरिकाने केवळ अधिकार न मागता आपले कर्तव्य ओळखून ‘स्वबोध’ विकसित करावा, असे आवाहन त्यांनी केले.

इस्कॉन नाशिकचे वरिष्ठ प्रचारक शिक्षाष्टकम प्रभुजी यांनी हिंदू समाजाने संघटित राहण्याचे महत्त्व विशद केले. या परिषदेस नाशिकचे संघचालक विजय मालपाठक आणि शहर कार्यवाह सुहास वैद्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *