महाराष्ट्र-व्हिएतनाम भागीदारीचे नवे पर्व; महाराष्ट्रात $6.5 अब्ज गुंतवणुकीची घोषणा

मुंबई, दि. 7 मे : मुंबई आणि हो ची मिन्ह सिटी यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करत व्यापार, पर्यटन, स्टार्टअप आणि सागरी व्यापार वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच भारत-व्हिएतनाम यांना जोडणारा बौद्ध वारसा असलेल्या अजिंठा-वेरूळसारख्या जागतिक वारसास्थळांच्या माध्यमातून पर्यटन सहकार्य वाढवण्यात येणार असून महाराष्ट्र व्हिएतनामचा भारतातील सर्वात विश्वासार्ह आणि मजबूत भागीदार बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. व्हिएतनामचे राष्ट्रपती तो लाम व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे ‘इंडिया – व्हिएतनाम बिझनेस फोरम’ येथे प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारत आणि व्हिएतनामचे संबंध हे विश्वास, सामायिक इतिहास आणि इंडो-पॅसिफिक प्रदेशातील शांतता, समृद्धी व स्थैर्याच्या समान दृष्टिकोनावर आधारित आहेत. व्हिएतनाम आज आशियातील वेगाने प्रगती करणारी अर्थव्यवस्था असून महाराष्ट्रही भारताच्या आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनले आहे. $660 अब्ज इतकी अर्थव्यवस्था, देशातील सर्वाधिक परकीय गुंतवणूक, मजबूत पायाभूत सुविधा, ऑटोमोबाईल, तंत्रज्ञान आणि स्टार्टअप इकोसिस्टिममुळे महाराष्ट्र जागतिक गुंतवणुकीचे आकर्षण ठरत आहे.

मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि गडचिरोली ही शहरे नव्या औद्योगिक आणि तंत्रज्ञान क्रांतीची केंद्रे बनत आहेत. व्हिएतनामच्या विन ग्रुपकडून महाराष्ट्रात $6.5 अब्ज गुंतवणुकीची घोषणा ही भारत-व्हिएतनाम आर्थिक संबंधांना नवी दिशा देणारी ठरणार आहे. इलेक्ट्रिक वाहन, सेमीकंडक्टर, लॉजिस्टिक्स, फिनटेक, पर्यटन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी नमूद केले.

यावेळी व्हिएतनाम चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे (VCCI) अध्यक्ष हो साय हंग, सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष वीर आडवाणी, व्हिएतनामचे शिष्टमंडळ व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *