नाशिकमधील ज्येष्ठ संघकार्यकर्ते वासुदेव (आबा) शिंगणे यांचे निधन

नाशिक, दि. 12 नोव्हेंबर 2026 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक, पूर्व प्रचारक आणि विविध सामाजिक-शैक्षणिक संस्थांचे आधारस्तंभ वासुदेव रामचंद्र शिंगणे तथा ‘आबा’ (वय 92) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. तसेच त्यांच्या निधनाच्या अवघ्या एक दिवस आधी पत्नी वृंदा वासुदेव शिंगणे (वय 82) यांचेही निधन झाले. एकाच दिवसाच्या अंतराने शिंगणे दाम्पत्याने जगाचा निरोप घेतल्याने नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि संघ परिवारात शोककळा पसरली आहे. आबा व वृंदा शिंगणे यांच्या पश्चात मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

आबा शिंगणे यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रकार्यासाठी आणि समाजसेवेसाठी समर्पित केले होते. त्यांच्या निधनाने संघ परिवारातील एक चालता-बोलता इतिहास हरपल्याची भावना व्यक्त होत आहे. आबा शिंगणे यांनी पूर्वआयुष्यात 1958 ते 1968 या दहा वर्षांच्या काळात पुणे ग्रामीण जिल्हा पूर्ण वेळ प्रचारक म्हणून संघकामाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली. प्रचारकी जीवनातील कार्यकाळात त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पाडळदे या गावात पहिली शाळा सुरू करून संघकार्याचा विस्तार केला. त्यानंतर गृहस्थाश्रमात प्रवेश करून त्यांनी नाशिकमध्ये रा. स्व. संघाचे ‘शहर कार्यवाह’ म्हणून कामाला सुरुवात केली आणि नाशिकमधील संघकार्याची पाळेमुळे घट्ट करण्यात मोठा वाटा उचलला.

संघकार्यासोबतच सामाजिक आणि जनजाती कल्याण क्षेत्रातही त्यांचे भरीव योगदान राहिले. त्यांनी जनजाती कल्याण आश्रमाचे जिल्हा प्रमुख म्हणूनही मोठे योगदान दिले असून, सुरगाणा तालुक्यातील जनजाती कल्याण आश्रमांतर्गत ‘गुही’ प्रकल्पाच्या संकल्पनेपासून तो प्रकल्प नावारूपाला आणण्यापर्यंत मोलाचा सहभाग नोंदवला. जनजाती कल्याण आश्रमाच्या प्रकल्पांसाठी शालेय विद्यार्थ्यांकडून छोट्या निधी संकलनाची अभिनव योजना राबवली. तसेच नाशिकमधील सुप्रसिद्ध श्री गुरुजी रुग्णालयासारख्या संघ परिवारातील सेवाभावी संस्थांच्या उभारणीसाठी त्यांनी विविध उपक्रमांतून मोठा निधी संकलित करून दिला.

शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपला स्वतंत्र ठसा उमटवला होता. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल व आरंभ महाविद्यालया’त अध्यापक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य केले. आरंभ महाविद्यालयात ‘किमान कौशल्य’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण प्रयोग राबवले आणि विविध सामाजिक-सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केले. याशिवाय, ‘गणित अध्ययन अध्यापक विकसन संस्थे’च्या माध्यमातून रा. गो. कुंटे यांच्यासमवेत भारतीय वैदिक गणित पद्धतीवर मोलाचे काम करत ‘संस्कृत भारती’च्या प्रचार व प्रसारातही ते सदैव अग्रभागी राहिले.

इतिहास संकलन आणि क्रांतीस्मृती जपण्यातही त्यांचा मोठा वाटा राहिला आहे. स्व. मोरोपंत पिंगळे यांच्या प्रेरणेतून 1996 पासून त्यांनी नाशिक जिल्ह्यात “अ.भा.इतिहास संकलन समितीचे” कार्य सुरू केले आणि ‘अनंत कान्हेरे स्मृती समिती’चे प्रमुख म्हणून काम पाहताना हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतीवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन केले.

आबांच्या या सर्व प्रदीर्घ सामाजिक आणि राष्ट्रीय कार्यात त्यांच्या पत्नी दिवंगत वृंदा शिंगणे यांची त्यांना मोलाची साथ लाभली. 24 तासांच्या अंतराने या आदर्श दाम्पत्याने इहलोकीची यात्रा संपवल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *