नूतन राज्यसभा खासदार माया इवनाते यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार

नागपूर, 29 मार्च : आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार कटीबद्ध आहे, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते आज नागपूर येथे खासदार माया इवनाते यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. माया इवनाते म्हणजे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी लढणारे सक्षम नेतृत्व असे गौरवोद्गार याप्रसंगी फडणवीस यांनी काढले.
याप्रसंगी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, एका सामान्य कुटुंबातून पुढे येत माया इवनाते यांनी संघर्ष, मेहनत आणि जिद्दीच्या बळावर स्वतःचे प्रभावी नेतृत्व घडवले, त्यांची राज्यसभेवर निवड ही अभिमानाची आणि प्रेरणादायी घटना आहे. शांत स्वभाव, व्यापक जनसंपर्क आणि लोकांशी असलेली घट्ट नाळ यामुळे राजकारणात त्यांनी यश संपादन केले.
नागपूर परिसरात आदिवासी बांधवांसाठी घरे उभारण्याच्या शबरी योजनेत त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून महत्त्वपूर्ण योगदान दिले. महापौर म्हणूनही त्यांची कारकीर्द उल्लेखनीय राहिली असून, विदर्भात त्यांनी जनसंपर्क अधिक बळकट केला. विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत त्यांनी महाराष्ट्र ते देशपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
भारतीय संविधानाने आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी निर्माण केलेल्या अखिल भारतीय जनजाती आयोगावर काम करण्याची संधी माया इवनाते यांना मिळाली. या माध्यमातून अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या समस्यांची सुनावणी करणे, हे महत्त्वाचे कार्य त्यांनी पार पाडले. समाजासाठी सातत्याने कार्यरत राहण्याची त्यांची वृत्ती विशेष उल्लेखनीय आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

