सर्व समाजाने मिळून राष्ट्रहितासाठी काम करणे आवश्यक : अनिल भालेराव

देवगिरी प्रांतात गृह संपर्क अभियानात १२ लाख घरांपर्यंत थेट संपर्क

छत्रपती संभाजीनगर, दि. १७ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक हरियाणातील समालखा येथे संपन्न झाली. संघटनात्मक कार्याचा विस्तार, राष्ट्रहितासाठी समाजातील सज्जन शक्तीची अधिक सक्रियता आणि सामाजिक समरसतेचा संकल्प यांसह ही बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक अनिल भालेराव यांनी पत्रकार परिषदेत विस्तृत माहिती दिली.

ते म्हणाले की, गेल्या वर्षभरात संघाच्या संघटनात्मक कार्यात उल्लेखनीय वाढ झाली आहे. देशभरात संघाच्या शाखांची संख्या सुमारे ६ हजारांनी वाढून आता ८८ हजारांहून अधिक झाली आहे, तर शाखा चालणाऱ्या स्थानांची संख्या ५५ हजारांपेक्षा अधिक झाली आहे. यासोबतच साप्ताहिक मिलन आणि संघ मंडळींची संख्याही वाढली आहे. कान्हदेश व मराठवाडा मिळून असलेल्या देवगिरी प्रांतामध्ये व्यापक गृह संपर्क अभियानात १२ लाख कुटुंबाशी थेट संपर्क झाल्याचे त्यांनी सांगितले. संघटनात्मक विस्ताराबरोबरच समाजात गुणवत्ता वृद्धीसाठी संघ सातत्याने कार्यरत आहे. ‘पंच परिवर्तन’ या उपक्रमाद्वारे समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. ‘भारतीयत्व’ किंवा ‘हिंदुत्व’ हे केवळ विचार नसून ती एक जीवनशैली आहे आणि त्याद्वारे समाजात गुणवत्ता वाढली पाहिजे. या उद्देशाने समाजातील सज्जन शक्तीला एकत्र आणून राष्ट्रहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

समाजातील महापुरुषांचे कार्य जात-पंथाच्या भेदांपलीकडे असून त्यांच्या विचारांतून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रेरणा घ्यायला हवी. आगामी वर्षात संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या प्राकट्य वर्षानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्याची योजना आहे. याच भावनेतून संघ स्वयंसेवकांनी नववे गुरु श्री गुरु तेग बहादुर जी यांच्या बलिदानाच्या ३५० व्या वर्षानिमित्त देशभरात २ हजारांहून अधिक कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यामध्ये ७ लाखांहून अधिक लोकांनी सहभाग घेतल्याचे त्यांनी सांगीतले.

देवगिरी प्रांतात गृह संपर्क अभियानातून 12 लाख घरापर्यंत झाला संपर्क :

देवगिरी प्रांतातील संघकार्याबाबत माहिती देताना त्यांनी सांगितले की, प्रांतात सध्या ५१७ दैनिक शाखा, ५९८ साप्ताहिक मिलन आणि ८६ संघ मंडळी सुरू आहेत. वर्षभरात ४५ प्रारंभिक वर्ग आयोजित करण्यात आले असून त्यामध्ये ३८०८ उपस्थिती होती. तसेच ८ प्राथमिक वर्गांमध्ये ४४६ उपस्थिती होती. याशिवाय २ संघ शिक्षा वर्गांमध्ये १५५ स्वयंसेवक सहभागी झाले. सेवा, शिक्षण, रोजगार, संस्कार आणि महिला सक्षमीकरण अशा विविध विषयांवर कार्य करणाऱ्या ४४ उपक्रमशील शाखा प्रांतात कार्यरत आहेत.

गृह संपर्क अभियानाच्या पहिल्या टप्प्यात २१ दिवसांमध्ये १२,००,९१९ कुटुंबांपर्यंत आणि ६६४८ गावांपर्यंत संघ पोहोचला आहे. याशिवाय देवगिरी प्रांतातील महाविद्यालयीन वस्तीगृहांमध्ये व खोल्यांमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांशीही मोठ्या प्रमाणावर संपर्क साधण्यात आला असून ही प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आगामी काळात गृह संपर्क अभियानाचा दुसरा टप्पाही राबविण्यात येणार आहे.

संपूर्ण देवगिरी प्रांतातील प्रत्येक तालुक्यात ‘सामाजिक सद्भाव’ या विषयावर एप्रिल महिन्यापासून बैठका आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख नागरिक संगोष्टी आयोजित केल्या जाणार आहेत. या बैठकींमध्ये समाजातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या प्रमुख व्यक्ती सहभागी होणार आहेत. तसेच संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने समाजाकडून मोठ्या प्रमाणात ‘हिंदू संमेलन’ कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

जनजाती समाजाच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण :

देवगिरी प्रांताची सामाजिक परिस्थिती लक्षात घेऊन जनजाती आणि भटके-विमुक्त समाजातील चाली-रीती, परंपरा तसेच समाजात निर्माण होणारा वैचारिक संभ्रम लक्षात घेऊन विविध स्तरांवर ‘चेतना परिषद’ आयोजित करण्यात आल्या. या परिषदांमध्ये डॉक्टर, वकील, शिक्षक, प्राध्यापक, महिला तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले.

नोव्हेंबर २०२५ मध्ये देवगिरी प्रांतातील नांदेड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, शिरपूर, चोपडा आणि तळोदा येथे जनजाती व भटके-विमुक्त समाजाच्या चेतना परिषदांचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदांमध्ये किनवट, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, भुसावळ, अमळनेर, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांतील ११ समाजांमधील एकूण १६९३ प्रतिनिधी सहभागी झाले होते. या कार्यक्रमांना पद्मश्री चैत्राम पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

तसेच भटके-विमुक्त चेतना परिषद (बीड, लातूर, धाराशिव जिल्हे) या कार्यक्रमात ३८ विविध समाजांतील २३० प्रतिनिधी सहभागी झाले होते. या परिषदेला भैय्याजी जोशी यांचे मार्गदर्शन लाभले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *