रावडी येथील विराट हिंदू संमेलनात ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे यांचे मार्गदर्शन

रावडी, दि. 12 एप्रिल : हिंदू धर्म, हिंदू समाज व हिंदू संस्कृती याबद्दलचे सकारात्मक प्रबोधन हे नक्कीच राष्ट्रहिताच्या दृष्टीने खूप उपयुक्त आहे. भारतीय संस्कृतीमध्ये मानवी जीवनासोबतच निसर्गाचा व अन्य सजीव सृष्टीचाही खूप गांभीर्याने विचार केलेला दिसतो. मानवी जीवन व निसर्ग यांचा समन्वय हाच खरा धर्म, असे विचार ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे यांनी व्यक्त केले. सकल हिंदू समाज व हिंदू संमेलन आयोजन समितीतर्फे भोर तालुक्यातील रावडी, कर्नावड, चिखलगाव व टिटेघर या गावांचे मिळून विराट हिंदू संमेलन हे खूप उत्साहात व धार्मिक वातावरणात संपन्न झाले. जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज ह. भ. प. शिवाजी महाराज मोरे यांनी उपस्थितांचे मार्गदर्शन केले. याप्रसंगी गुरुकुल धामचे संस्थापक ह. भ. प. उमेश महाराज शिंदे, विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनीच्या हर्षदा धुमाळ व रा. स्व. संघ बारामती तालुक्याचे कार्यवाह अमोल देशमुख हे प्रमुख अतिथी व वक्ते म्हणून उपस्थित होते.
प्रभू श्री रामचंद्र, छत्रपती श्री शिवाजी महाराज व भारत माता यांच्या प्रतिमा पूजनाने या संमेलनाची सुरुवात झाली. यानंतर या चारही गावातील भजनी मंडळांनी भजने सादर केली. संघशताब्दी निमित्त सांस्कृतिक वार्तापत्राने काढलेल्या विशेषांकाचे प्रकाशन यावेळी प्रमुख अतिथींच्या हस्ते झाले. यानंतर प्रमुख अतिथींनी आपले विचार सर्वांसमोर मांडले.
ह. भ. प. उमेश महाराज शिंदे यांनी, भारताचा दैदीप्यमान इतिहास व धर्मनिष्ठ महापुरुष यांबद्दल प्रबोधन केले. दुर्गा वाहिनीच्या हर्षदा धुमाळ यांनी सांगितले की, हिंदू संस्कृतीमध्ये स्त्रीचे स्थान हे नेहमीच प्रेरणादायी व श्रद्धेचेच राहिले आहे. आजही समाजात मातृशक्तीने जागृत राहून विघातक घटकांपासून दूर राहावयास हवे. त्यानंतर संघाचे तालुका कार्यवाह अमोल देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी पंचपरिवर्तन व संघाची समाजातील वाढती स्वीकारार्हता, याबद्दल मार्गदर्शन केले. हिंदू समाजातील प्रत्येक घटकामध्ये एकत्वाची भावना वाढायला हवी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
हिंदू संमेलन समितीचे संयोजक बबन गिरे यांनी प्रस्ताविक केले. श्रेया कोंढाळकर व सृष्टी कुडपणे यांनी सूत्रसंचालन केले. विष्णू वाडकर यांनी परिचय करून दिला. सदर संमेलनासाठी विश्वास जोशी, सोपान तांगडे, राजेंद्र कुडपणे, शशिकांत कुडपणे, विनायक गोखले, अरविंद जाधव, अजय धुमाळ, मंगेश धावले, माधव जोशी व प्रदीप गोरड यांनी प्रयत्न केले. सामूहिक पसायदानाने संमेलनाची सांगता झाली.

