24 मे रोजी देशभरातून दीड लाख तर महाराष्ट्रातून १० हजार बांधव एकत्र येणार

पुणे, दि. 22 मे : जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने येत्या रविवारी दि. २४ मे रोजी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ला मैदानावर ‘जनजाती सांस्कृतिक समागम २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनजाती अस्मितेचे प्रतीक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने हा ऐतिहासिक सोहळा होत असून, यासाठी देशभरातील ५०० हून अधिक जनजातींचे सुमारे दीड लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी राजधानीत एकत्र येणार आहेत. विशेष म्हणजे, यामध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमधून १० हजार जनजाती बांधव सहभागी होणार आहेत.
धर्म, संस्कृती, परंपरा यासोबतच जल, जमीन आणि जंगलासाठी ऐतिहासिक संघर्ष करणारे भगवान बिरसा मुंडा हे जनजाती समाजाचे आराध्य दैवत मानले जातात. त्यांच्या आदर्शांचे स्मरण करण्यासाठी आणि जनजातींच्या समृद्ध, गौरवशाली परंपरांचा गौरव करण्यासाठी या समागमाचे आयोजन करण्यात आले आहे. “तू-मैं एक रक्त – वनवासी, ग्रामवासी, नगरवासी, आपण सर्व भारतवासी” हे या कार्यक्रमाचे मुख्य सूत्र असून, याद्वारे सामाजिक समरसतेचा भाव अधिक दृढ केला जाणार आहे. आपल्या संस्कृतीच्या रक्षणाचा संकल्प घेऊन पहिल्यांदाच जनजाती समाज एवढ्या मोठ्या संख्येने दिल्लीत एकत्र येत आहे.
२४ मे रोजी आयोजित करण्यात आलेली भव्य सांस्कृतिक शोभायात्रा हे या सोहळ्याचे मुख्य आकर्षण असेल. देशाच्या विविध भागांतून पारंपरिक वेशभूषेत आलेले जनजाती बंधू-भगिनी या शोभायात्रेत सहभागी होऊन दिल्लीकरांना आपल्या थोर सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवतील. ही शोभायात्रा दिल्लीतील पाच वेगवेगळ्या ठिकाणांमधून सुरू होईल. जनजाती परंपरा आणि सांस्कृतिक विविधतेचे प्रतीक असणाऱ्या या पाचही यात्रांचा समारोप लाल किल्ला मैदानावर होईल. यानंतर तेथे भव्य जनसभेचे आयोजन करण्यात आले असून, भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या जनसभेला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्वीकारले आहे.
महाराष्ट्रातून विशेष रेल्वे सुटणार:
या ऐतिहासिक समागमासाठी महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यांमधील जनजाती क्षेत्रांतून जवळपास १० हजार महिला व पुरुष प्रतिनिधी दिल्लीला जाणार आहेत. ही सर्व मंडळी विशेष रेल्वेने दिल्लीकडे रवाना होणार असून, कार्यकर्त्यांमध्ये आणि समाजबांधवांमध्ये सध्या कमालीचे उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, दिल्लीत येणारे हे सर्व दीड लाख प्रतिनिधी कोणत्याही शासकीय मदतीशिवाय, स्वतःच्या खर्चाने या राष्ट्रीय सोहळ्यासाठी उपस्थित राहत आहेत.
दिल्लीकरांकडून जय्यत तयारी:
दुर्गम वनक्षेत्रात राहणाऱ्या आपल्या देशबांधवांचे स्वागत करण्यासाठी दिल्लीतील नागरिक आणि विविध संस्थांनी कंबर कसली आहे. येणाऱ्या बांधवांच्या सुविधेसाठी दिल्लीत राहणे, अन्न-पाणी, वाहतूक, वैद्यकीय सेवा, सुरक्षा आणि स्वच्छता यांसाठी २० वेगवेगळ्या विभागांची स्थापना करण्यात आली असून अनेक समित्या कार्यरत आहेत.
“हा केवळ एक सांस्कृतिक कार्यक्रम नसून, आपण सर्वजण एकाच संस्कृतीचे, एकाच परंपरेचे आणि एकाच भूमीचे पुत्र आहोत ही ‘तू-मैं एक रक्त’ची राष्ट्रीय भावना या माध्यमातून अधिक दृढ होईल,” असा विश्वास जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे.
कार्यक्रमाची प्रमुख उद्दिष्टे:
– भगवान बिरसा मुंडा यांच्या आदर्शांचे आणि संघर्षाचे स्मरण करणे.
– जनजातींच्या समृद्ध सांस्कृतिक आणि गौरवशाली परंपरांचा राष्ट्रीय पातळीवर गौरव करणे.
– सांस्कृतिक आदानप्रदान आणि संवादासाठी एक देशव्यापी व्यासपीठ निर्माण करणे.
– विविध घटकांमध्ये परस्पर समन्वय साधून सामाजिक समरसतेचा भाव दृढ करणे.

