जाती-पातीचे भेद सोडून हिंदू संघटन काळाची गरज : महंत रामगिरी महाराज

सावखेडा, दि. 28 मार्च : “सध्याच्या काळात हिंदू समाजाने एकत्र येणे अत्यंत आवश्यक आहे. अन्याय सहन करणे म्हणजे अन्याय करणाऱ्याचे मनोबल वाढवणे होय. त्यामुळे जाती-पातीचे आणि पक्षीय मतभेद बाजूला सारून सर्वांनी ‘हिंदू’ म्हणून संघटित व्हावे,” असे आवाहन सरला बेटचे महंत सद्गुरू रामगिरी महाराज यांनी केले. सावखेडा येथे आयोजित हिंदू संमेलनात ते बोलत होते. याप्रसंगी मठाधिपती महंत कैलास गिरी महाराज (सावखेडा), महंत नारायण नंदगिरी महाराज (सावखेडा) आणि डॉ. जनार्दन मेटे महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती.

संस्कृती आणि स्वरक्षणाचा जागर

कार्यक्रमात हिंदू जनजागृती समितीच्या मराठवाडा संघटक प्रियंका लोणे यांनी महिलांवरील वाढते अत्याचार आणि ‘लव्ह जिहाद’ सारख्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, महिला आणि मुलींनी स्वधर्माप्रती जागृत राहून कपाळावर कुंकू लावावे, तर पुरुष बांधवांनी गंध धारण करून आपल्या संस्कृतीचे रक्षण करावे. अन्याय विरुद्ध उभे राहण्याची ताकद समाजाने निर्माण करायला हवी, असेही त्यांनी नमूद केले.

‘पंच परिवर्तना’तून समाज घडवण्याचा संकल्प

अखिल भारतीय समरसता मंडळाचे सदस्य डॉ. प्रसन्न पाटील यांनी ‘पंच परिवर्तन’ या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने पाच सूत्रांवर भर देण्यात आला :

– पर्यावरण संरक्षण: झाडे लावणे आणि निसर्गाचे जतन करणे.

– नागरिक कर्तव्य: कचरा रस्त्यावर न टाकता कचरा गाडीतच टाकणे आणि वाहतुकीच्या नियमांचे (सिग्नल, वेगमर्यादा) काटेकोर पालन करणे.

– कुटुंब प्रबोधन: कुटुंबातील सर्वांनी दिवसातून किमान एक वेळचे जेवण एकत्र घ्यावे.

– सामाजिक समरसता: समाजात बंधुभाव जपून अस्पृश्यता व भेदभाव नष्ट करणे.

– स्व-बोध: आपल्या संस्कृती आणि धर्माचा अभिमान बाळगणे.

कौटुंबिक मूल्यांवर भर

आपली कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आठवड्यातून किमान एक तास हनुमान चालीसा, भजन किंवा हरिपाठासाठी द्यावा. तसेच गावातील ग्रामदेवतेच्या दर्शनाला सहकुटुंब जावे आणि जेवताना देव, देश व धर्माच्या विषयावर चर्चा करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

या सोहळ्याला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सामाजिक समरसता आणि राष्ट्रभक्तीची शपथ घेण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *