मेट्रो भवन : पुणे मेट्रोच्या नियंत्रण आणि वेगाला नवे केंद्र

पुणे, दि. 15 मार्च : पुणे शहर आता ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (GCC) चे केंद्र बनत आहे. महाराष्ट्र हे जीसीसी धोरण आखणारे देशातील पहिले राज्य ठरले असून, पुण्याने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या विकासाच्या गतीचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचे उदघाटन संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते. या इमारतीच्या रूपाने पुणे मेट्रोला स्वतःचे हक्काचे घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भिमराव तापकीर, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुणे मेट्रोच्या कामाची गती ही देशातील सर्वाधिक वेगवान मेट्रो कामांपैकी एक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी मेट्रो टीमचे कौतुक केले. मेट्रो भवन हे केवळ एक कार्यालय नसून, मेट्रोच्या स्वयंचलित सिग्नलिंग, कमांड अँड कंट्रोल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे हृदय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी अशा प्रकारच्या सुसज्ज इमारतीची नितांत गरज होती, जी आज पूर्ण झाली आहे.

पुणेकरांनी मेट्रोचा उदंड प्रतिसाद दिला असून, दैनंदिन प्रवाशांची संख्या 2.5 लाखांच्या पार गेली आहे. विशेषतः गणेशोत्सवात एकाच दिवशी पावणे सहा लाख प्रवाशांनी प्रवास करून विक्रम प्रस्थापित केला. हा ओघ पाहता, मुख्यमंत्री यांनी पुणे मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 200 किलोमीटरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन जाहीर केले. यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्राचे पूर्णपणे एकत्रीकरण (Integration) केले जाणार आहे. मेट्रोच्या कामाची गती 5 वर्षांवरून 3 वर्षांवर आणण्याचे जागतिक निकष गाठण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या,

आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या या इमारतीमुळे मेट्रोशी संबंधित जनसंपर्क, वाहतूक व प्रशासकीय कामे आता एकाच छताखाली अधिक सुलभतेने पार पडणार आहेत, ही बाब महत्त्वपूर्ण आहे. पुणे मेट्रो प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात मेट्रो प्रकल्पाला गती मिळावी यासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला. दर्जेदार आणि आधुनिक प्रशासकीय इमारती उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते आणि त्याच विचारातून आज पुण्यात विविध दर्जेदार शासकीय इमारती उभ्या राहताना दिसत आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे असे सांगत त्यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला.

त्या पुढे म्हणाल्या, सध्या सुमारे ३३ किमीचा मेट्रो मार्ग पूर्ण झाला असून पुणे शहर हे मेट्रो सिटी म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत आहे. मेट्रोमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. मेट्रो भवन ही केवळ प्रशासकीय इमारत नसून पुणे शहराच्या आधुनिक आणि सक्षम विकासाची दिशा दर्शवणारे महत्त्वाचे पाऊल आहे. पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे, अशा भावना सुनेत्रा पवार यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त केल्या.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *