विदर्भाच्या औद्योगिक प्रगतीचा नवा अध्याय!

चंद्रपूर, दि. 14 मार्च : पर्यावरणाला धोका न पोहोचवता स्टील उत्पादन करणे ही भविष्याची गरज असून ग्रीन स्टील उत्पादनाचे लक्ष्य चंद्रपूरमधील या प्रकल्पातून साकार होणार आहे. येथे उत्पादित होणारे स्टील देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात केले जाईल. यातून 10 हजार रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांच्या हस्ते आज चंद्रपूर येथे भद्रावती एमआयडीसी परिसरात न्यू एरा क्लीनटेकच्या इंटिग्रेटेड कोल गॅसिफिकेशन (कोल-टू-केमिकल्स) आणि कार्बन कॅप्चर प्रोजेक्टचे तसेच ग्रेटा एनर्जीच्या इंटिग्रेटेड ग्रीन स्टील प्रकल्पाचे भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, माजी मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार अजय संचेती, कोल इंडियाचे चेअरमन संजीव कुमार झा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, ग्रेटा एनर्जीचे चेअरमन नितेश चौधरी, वैभव काकुलते, व्यवस्थापकीय संचालक हेमंत पांडे (वेकोली), अनुप गोयल (ग्रेटा एनर्जी), बाळासाहेब दराडे (न्यू एरा क्लिनटेक), मधुसूदन अग्रवाल, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, विदर्भाचा भाग खनिजसंपत्तीने समृद्ध असून या संपत्तीचा उपयोग पर्यावरणपूरक पद्धतीने कसा करता येईल हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे धोरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत या खनिज संसाधनांचा जबाबदारीने व शाश्वत वापरासाठी जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाचा अवलंब करत आहे. त्यासाठी केंद्र सरकारने प्रोत्साहन आणि आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे.
या प्रकल्पाच्या माध्यमातून कोल गॅसिफिकेशन तंत्रज्ञानाचा वापर करून कोळशामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यात येणार आहे. कोळशापासून गॅस निर्मिती करून एलपीजीला पर्याय म्हणून प्रदूषणमुक्त गॅस तयार करण्याची क्षमता या प्रकल्पातून विकसित केली जाणार आहे. देशात कोल गॅसिफिकेशनचे 7 प्रकल्प मंजूर झाले असून त्यापैकी 4 प्रकल्प विदर्भात आले असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यू एरा आणि ग्रेटा एनर्जी या दोन्ही कंपन्यांना आवाहन केले की त्यांच्या प्रकल्पामधील तांत्रिक कामांसाठी आसपासच्या परिसरातील महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना प्रशिक्षण द्यावे आणि त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात. यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करेल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले.
केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यावेळी बोलताना म्हणाले, चंद्रपूर आणि भद्रावती या भागात नवीन तंत्रज्ञानायुक्त औद्योगिक कंपनी येत आहे. यातून या भागाचा विकास होईल. दोन्ही कंपन्यांच्या आगमनाने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून १७ हजार कोटीची गुंतवणूक भद्रावती येथे येत आहे.

