महायुती सरकार महाराष्ट्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी प्रयत्नशील : एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 12 मार्च : महाराष्ट्र देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाचे इंजिन असून राज्याला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पायाभूत सुविधा, उद्योग गुंतवणूक आणि गृहनिर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्याचा गृहनिर्माण विभाग व आयडॅक, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ‘आयडिया एक्स्पो 2026’ या पायाभूत सुविधा आणि बांधकाम क्षेत्रातील प्रदर्शनाचे उद्घाटन आज शिंदे यांच्या उपस्थितीत बीकेसी येथील जियो वर्ल्ड सेंटर येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

आयडिया एक्स्पो हे केवळ प्रदर्शन नसून नवीन तंत्रज्ञान, कल्पना आणि विकासाचा रोडमॅप ठरवणारे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. हा सातवा आयडिया एक्स्पो असून तीन दिवसांच्या प्रदर्शनात 15 ते 20 हजार लोक सहभागी होतील. आर्किटेक्ट, बिल्डर्स, शहरी नियोजक, उद्योग क्षेत्रातील नेते, धोरणकर्ते आणि पर्यावरण तज्ज्ञ एकत्र येऊन शाश्वत विकासावर चर्चा करतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

‘मेक इन इंडिया’ सोबत आता ‘मेक फॉर वर्ल्ड’चा विचार करण्याची गरज आहे. महाराष्ट्र सरकार वेगाने निर्णय घेणारे सरकार आहे. “आयडिया एक्स्पो 2026′ नवीन तंत्रज्ञान आणि नवकल्पनांसाठी मोठे व्यासपीठ ठरेल असे शिंदे यावेळी म्हणाले.

यावेळी गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर, म्हाडाचे अध्यक्ष संजीव जयस्वाल, ज्येष्ठ वास्तूविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर, मुंबई फर्स्ट संस्थेचे अध्यक्ष सतीश कुमार सिन्हा, महिंद्रा लाइफस्पेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कॉन्ट्रॅक्टर, नाईट फ्रँकचे वरिष्ठ कार्यकारी निर्देशक देबेन मोझा, आयडॅक एक्स्पोचे आयोजक धवल ठाकूर, सिद्धार्थ श्रॉफ तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *