
पुणे, दि. ८ मार्च : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाचे लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेर आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने करण्यात आले. पश्चिम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या या डबल डेकर उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असून या पुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी भूमिका यावेळी पुण्याचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मांडली. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी यावर सकारात्मकता दर्शवत स्व. अजितदादांचं नाव देण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, पक्षाचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे आदी उपस्थित होते.
लोकार्पण केलेला डबल डेकर उड्डाणपूल १.७० किलोमीटर लांबीचा असून सर्वात वरच्या भागातून मेट्रो, पहिल्या मजल्यावरुन आणि खालील रस्त्यावर वाहनांची वाहतूक, असे नियोजन करण्यात आले आहे. औंध व बाणेर ते शिवाजीनगर अशा प्रत्येक दोन लेनरॅम्प करण्यात आले असून त्यामुळे वाहतूक व्यवस्था सुलभ होण्यास निश्चित मदत होणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या या डबल डेकर उड्डाण पुलाच्या कामासाठी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विशेष लक्ष घातले होते. माझ्याकडे महापौरपदाची जबाबदारी असताना या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली होती. यावेळी उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री असलेल्या स्व. अजितदादांनी सर्वांना सोबत घेऊन काम पुढे नेले. या शिवाय वेळोवेळी प्रत्यक्ष पाहणी करून काम दर्जेदार आणि वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही अजितदादा देत होते. त्यामुळे या डबल डेकर उड्डाणपूल प्रकल्पाला स्व. अजितदादांचे नाव देणे, हीच खरी श्रद्धांजली असेल अशी भूमिका मोहोळ यांनी याप्रसंगी मांडली. यावेळी मोहोळ यांच्या भूमिकेला मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

याप्रसंगी संबोधित करताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, “या उड्डाणपूलामुळे पुणे शहराच्या वाहतूक कोंडीच्या समस्येवर दिलासा मिळणार आहे. आदरणीय अजितदादांची आज प्रकर्षाने आठवण होत आहे. शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेत, दादांनी पूल पाडण्याचा धाडसी निर्णय घेतला होता. आज या उड्डाणपूलाचे लोकार्पण म्हणजे आदरणीय अजितदादांच्या दूरदृष्टीचा परिणाम आहे.” दादांनी पुणे शहराच्या विकासाचे जे स्वप्न पाहिले ते आपल्याला पूर्ण करायचे आहे, असा निर्धार सुनेत्रा पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

