कल्याण लोकसभा मतदारसंघात आता वाहतूक व्यवस्थेचा नवा पॅटर्न

खाली रस्ता, मध्ये फ्लायओव्हर आणि वर मेट्रो

कल्याण, दि. 3 मार्च : कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांची मुख्य उपस्थिती होती.

यावेळी बैठकीत खालील महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली –

– कल्याण लोकसभा मतदारसंघातून जाणाऱ्या सर्व मेट्रो मार्गिका या डबल डेकर पद्धतीने उभारण्यात येणार आहेत. यामध्ये कल्याण तळोजा मेट्रो १२, कांजूरमार्ग – बदलापूर मेट्रो १४, तसेच ठाणे भिवंडी कल्याण मेट्रो ५, दुर्गाडी मार्गे कल्याण – उल्हासनगर – अंबरनाथ – चिखलोली येथे जाणारी ५ अ, शिळफाटा रांजणोली उन्नतमार्ग, वालधुनी ते नेवाळी उन्नत मार्ग हे सर्व वाहतूक प्रकल्प हे डबल डेकर अर्थातच खाली रस्ता वर फ्लायओव्हर आणि जेथून मेट्रो मार्गिका जाणार आहे त्याठिकाणी वरती मेट्रो मार्गिका असे स्वरूप असणार आहे. या प्रकल्पांच्या उभारणीसाठी एमएमआरडीए कडून काम सुरू आहे.

– तर मेट्रो ५ चे पुन्हा दोन टप्प्यात विस्तारीकरण करून ५ ब ( चिखलोली ते बदलापूर ) तर ५ क ( दुर्गाडी ते टिटवाळा ) अशा मार्गिका उभारण्यात येणार आहे. तर मेट्रो १२ चे ही विस्तारीकरण करून मेट्रो १२ ब ( शिळफाटा ते कळवा – मुंब्रा मार्गे ठाणे ) अशी उभारणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. एमएमआरडीए प्राधिकरणाकडून देखील याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला असून, याबाबत लवकरच आराखडा तयार करण्यात येणार आहे.

– मेट्रो १२ चे काम देखील सध्या जलदगतीने सुरू आहे. यातील मार्गात पिलर उभारणीचे, तसेच स्थानक उभारणीचे काम सुरू आहे. याला अधिक वेग देण्याच्या सूचना यावेळी केल्या. याच समवेत १२ अ देखील नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. याबाबत देखील काम जलदगतीने करण्यात यावे. तर मेट्रो १२ ब चा आराखडा तयार करण्यात यावा. यामध्ये मेट्रो १२ ची एक विस्तारित मार्गिका ही शिळफाटा मार्गे, मुंब्रा – कळवा येथून जाईल आणि त्याची जोडणी पुढे थेट ठाण्याला होईल. अशा सूचना यावेळी शिंदे यांनी दिल्या.

– एक्सेस कंट्रोल मार्गाच्या उभारणीमुळे कल्याण पलीकडच्या शहरातील नागरिकांना थेट मुंबई आणि नवी मुंबई गाठणे सोपे होणार आहे. तर या मार्गाला बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली तसेच पुढील सर्व शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाची जोडणी करण्याबाबत सूचना दिल्या. बदलापूर – काटई मार्गावरील अनधिकृत बांधकाम हटवून त्याचे रुंदीकरण करण्यात यावे. तर हा मार्ग बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली येथे जातो. तर या मार्गाची शहराच्या दुसऱ्या बाजूला देखील जोडणी करावी. डबल डेकर मार्गांच्या माध्यमातून आणि त्याची जोडणी ही या शहरांच्या एका बाजूने जाणाऱ्या एक्सेस कंट्रोल मार्गाला देखील करण्यात यावी. तर याच रस्त्यावरून मेट्रो १४ जात असून या मार्गिकेला ही याची जोडणी करण्यात येणार आहे.

– वाहतुकीचा ताण कमी व्हावा आणि नागरिकांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा यासाठी शिळफाटा – रांजनोली येथे द्विस्तरिय (डबल डेकर) रस्ता उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या रस्त्याची उभारणी साठी जलदगतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशा स्पष्ट सूचना यावेळी खासदार शिंदे यांनी दिल्या. कल्याण (पूर्व)यु टाईप व श्रीमलंग रस्त्याचे काम जलदगतीने मार्गी लावावे. यासाठी लागणाऱ्या जमिनीचे संपादन देखील लवकर करावे. तर या ठिकाणी बाधित होणाऱ्या नागरिकांना जवळील बीएसयुपी घरांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित करण्यात यावे. तर या दरम्यान या भागात क्लस्टर योजना राबवून येथील नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर बांधून देण्यात यावे. तर व्यवसायिकांना गाळे देण्यात यावे, असे ही सांगण्यात आले.

– ऐरोली – काटई फ्री वे दरम्यान आलेल्या काटई नाका येथील बोगद्याचे काम जलदगतीने पूर्णत्वास न्यावे. तर यातील टप्पा ३ साठी लागणाऱ्या जमिनीची भूसंपादन प्रक्रिया जलदगतीने पूर्णत्वास न्यावी, अशा सूचना यावेळी दिल्या. यांसह मतदारसंघातील विविध महत्वाच्या प्रकल्पांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी आमदार राजेश मोरे, डॉ.बालाजी किणीकर, कल्याण डोंबिवली महापौर हर्षाली चौधरी, उल्हासनगर महापौर अश्विनी निकम, उपमहापौर अमर लुंड, ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त अभिनव गोयल, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेंद्र शिंदे, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उल्हासनगर महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळ विविध महापालिका, प्रशासकीय संस्था यांचे अधिकारी, अभियंते तसेच शिवसेनेचे स्थानिक महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *