आम्ही शिवसैनिक आहोत, आमच्या नादाला कोणी लागू नये : एकनाथ शिंदे

सोलापूर जिल्ह्यातील सभेत एकनाथ शिंदेंची गर्जना

वळसंग (जि. सोलापूर), दि. ४ फेब्रुवारी : इथे कोणत्याही प्रकारची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही, आम्ही शिवसैनिक आहोत, आम्ही कोणाच्या नादाला लागत नाही आणि आमच्या नादाला कोणी लागू नये. कायदा-सुव्यवस्था राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दात शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना सुनावले. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील वळसंग येथील शंकरलिंग देवस्थान मैदानावर शिवसेना पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला शिंदे यांनी संबोधित केले. यावेळी शेतकरी, महिला, युवक, आरोग्य, पायाभूत सुविधा, विकासकामे आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व मुद्द्यांवर त्यांनी पक्षाची सविस्तर भूमिका मांडली.

दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक गावापर्यंत उजनी धरणाचे पाणी पोहोचवले जाईल तसेच वीजपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यात येईल असे याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी आश्वासित केले. शेतकरी सन्मान योजना, पीक विमा योजना, एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून नुकसानभरपाई, दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत, ऑक्टोबरमधील नुकसानीसाठीही शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा उल्लेख याप्रसंगी करत ३२ हजार कोटींचे पॅकेज दिल्याचे एकनाथ शिंदे यांनी नमूद केले. शेतकरी हा राज्याच्या तिजोरीवरील पहिला हक्कदार असल्याचे यावेळी त्यांनी ठामपणे सांगितले.

शेतकऱ्यांना कर्जमाफीबाबत कमिटी गठीत झाली असून योग्य वेळी कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही असा शब्द याप्रसंगी एकनाथ शिंदे यांनी दिला. वचननाम्यातील प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्याची आमची जबाबदारी असल्याची ग्वाही त्यांनी याप्रसंगी दिली. हरणा नदीवरील पुलाचा प्रश्न सोडवण्यात आला आहे, तसेच पितापूर ते ओरई आणि पितापूर ते दर्शन मार्गावरील रस्त्यांच्या दुरुस्तीचे आदेश दिले आहेत असे यावेळी एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. वैराग येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी २.५ कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केल्याचे उदाहरण देत, काम करायचे असेल तर आपण जागच्या जागी निर्णय घेतो, असे त्यांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यातील सोलर प्रकल्पातून शेतकऱ्यांना एकरी ३५ हजार रुपये मिळत असल्याचा उल्लेख करून, हा मोबदला ५० हजार रुपये प्रति एकर मिळाला पाहिजे, असा सरकारचा निर्णय असल्याचे अधोरेखित करत तो अंमलात आणण्याचे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.

https://www.facebook.com/share/v/14TwgmZbqzx/

यावेळी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे, माजी मंत्री सिद्धराम म्हेत्रे, संपर्कप्रमुख महेशनाना साठे, सोलापूर जिल्हाप्रमुख अमोल बापू शिंदे, माजी शहरप्रमुख मनिष काळजे तसेच स्थानिक शिवसेना पदाधिकारी, शिवसेनेचे सर्व उमेदवार, शिवसैनिक आणि मोहोळ तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *