स्व. दादा रत्नपारखी यांचे जीवन हिच संघकामाची प्रेरणा : शरद ढोले

मार्तंड ते तापहिन स्मृतिग्रंथाचे प्रकाशन

नाशिक, ३ फेब्रुवारी : जेष्ठ संघ कार्यकर्ते कै. दादासाहेब रत्नपारखी हे शांतीब्रम्ह होते. त्यांची दाहकता नव्हती तर त्याच्यातील समर्पण, साधेपणा, आत्मियता, प्रसिध्दीपराङ्मुखता या सगळ्यात ते मार्तंड होते. आपल्या ७५ वर्षाच्या संघकार्यपध्दतीत त्यांनी ‘संघ’ कसा जगायचा याचा आदर्श वस्तूपाठ सर्वांसमोर घालून दिला असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे अ. भा. धर्मजागरण समन्वय संयोजक शरद ढोले यांनी केले. अशा निःस्वार्थी स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या अनुभवातून संघ कसा जगला पाहिजे हे पुढील पिढीला माहिती होण्यासाठी स्मृतीग्रंथ निर्मिती होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

तीन दशकांहून अधिक काळ संघकार्य तसेच त्यापुढील तीन दशकात नाशिकमधील विविध शैक्षणिक व सामाजिक संस्थांचे पदाधिकारी स्व. प्रा. रमेश धोंडोपंत तथा दादा रत्नपारखी यांच्या संघसमर्पित जीवनावर अंशतः प्रकाश टाकणाऱ्या ‘मार्तंड जो तापहीन’ या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन आज डॉ. मुंजे इन्स्टिट्युटच्या सभागृहात झाले. त्यावेळी ढोले प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी राजेश रत्नपारखी, स्मृतीग्रंथाचे संपादक गोविंद यार्दी, नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंके, सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह सीएमए हेमंत देशपांडे हे व्यासपीठावर होते.

ढोले यांनी आपल्या भाषणात कै. दादासाहेब यांची कार्यपध्दती मांडण्याबरोबरच त्यांच्या आठवणींना विविध प्रसंगातून उजाळा दिला. ते म्हणाले, मार्तंड हे प्रकाशमान, तेजस्वी असते. दादा आपल्या गुणवैशिष्ट्यांमुळे खरोखरच मार्तंड होते. दादा म्हणजेच संघ आणि संघ म्हणजेच दादा हे वेगळे नव्हते आपण लक्षात घ्यावे. त्याच्यातील कामाची निष्ठा, प्रामाणिकपणा आणि दादांचे मार्गदर्शकांच्या भूमिकेतून सांगणे हे सर्वांनाच नेहमी भावले.

निगर्वी, निस्वार्थी अन् संस्थाप्रती आत्मियता

शरद ढोले पुढे आपल्या भाषणात म्हणाले, दादांनी विविध संस्थांवर पदे भूषवली आणि ती सहजपणे सोडली. शाखा कार्यवाह ते विभाग कार्यवाह राहिलेल्या दादांना आणीबाणीमध्ये नाशिक कारागृहात असतांना महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मिसाबंदी बाराशे स्वयंसेवकांचे सर्व कार्यक्रम घेण्यासाठी पूर्ण दीड वर्षे कार्यवाह म्हणून नेमले गेले. दादांनी अशी खूप सारी कामे केली, अनेकांना आर्थिक मदतही केली, पण कधीही ही कामे, मदत याचा उल्लेख, कधीही त्यांनी केला नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे.

तन, मन, धन जीवन से… उक्तीची प्रचिती

दादांनी संघ उभा करत अनेक कार्यकर्ते, स्वयंसेवकांची फळी उभी केली आहे, असे नमूद करून ढोले म्हणाले, या स्मृतिग्रंथातील अनेक लेखातून दादांच्या कार्यपध्दतीचे लेखन केले आहे. त्यात एक प्रभावी व्यक्तीमत्व म्हणून दादांकडेच पाहता येईल. दादा म्हणजे समर्पण आणि जेथे आवश्यकता तेथे तन, मन आणि हवं असेल धनरूपानेही त्यांची उपस्थिती नक्कीच असे.

दादांनी दोन पिढ्या संघ विचारांचे काम करत कार्यकर्ते, स्वयसेवक घडवत तो जसांच्या तसा पुढील पिढीसाठी देण्याचा प्रयत्न केला. बाहेर तत्वज्ञान सांगणे सोपे आहे तर घरात सांगणे हि कसरतच असते. पण दादांनी जे आहे ते पूर्ण संघ,संघ विचाराचे आहे हे मनी ठरवले होते. त्यानुसार संघ व इतर दुसरे काही यात भेदाभेद केला नाही. सार्वजनिक संस्थाच्या बैठकीत हे संघाने सांगितले आहे म्हणून करायचे आहे असे त्यांनी कधीही सांगितले नाही. जे संस्थेच्या धोरणात, नियमात बसत असेल ते झाले पाहिजे असे दादांचे प्रामाणिक मत होते असे ढोले यांनी यावेळी सांगितले.

प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी ते स्वतः जळगावला प्रचारक असतांना दादांचा सहवास लाभल्याचे सांगत दादांच्या वडिलांनी संघशिबीर पाहुन येण्यासाठी दादांना सायकलवर पाठवले होते हा प्रसंग सांगितला. दादांनी विविध पदे भूषवली पण त्यांच्यात पदांबाबतचा कधी लवलेशही जाणवला नाही. संघशताब्दी वर्षे सुरु असल्याने अशाच स्वयंसेवक कार्यकर्त्यांच्या विचार, कार्यपध्दती पुढे यायला हवी, दादांनी संघातील विभाग कार्यवाह या जबाबदारीतून मुक्त झाल्यावर अभिनिवेशविरहित एका सामान्य स्वयंसेवकाप्रमाणे आचरण करून आदर्श वस्तूपाठ घालून दिला.

यावेळी स्मृतीग्रंथाचे संपादक गोविंद यार्दी यांनी स्मृतीग्रंथामागील उद्देश व संकल्पना मांडली. राजेश रत्नपारखी यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रकाशक अविनाश पाठक, सौ. पाठक यांचा सत्कार करण्यात आला. कौमुदी परांजपे यांनी सुत्रसंचालन केले.  तर हेमंत देशपांडे यांनी आभार मानले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्वांनी उभे राहून दोन मिनिटे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांना श्रध्दांजली अर्पण केली. शांतीमंत्राने कार्यक्रमांची सांगता झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *