‘समर्पणाचा शतकोत्सव’ : विदर्भ हुंकारच्या संघ शताब्दी विशेषांकाचे प्रकाशन

नागपूर, 28 डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी प्रवासात स्वयंसेवकांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक सेवा, शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती या प्रत्येक क्षेत्रात संघकार्य प्रभावीपणे सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून राष्ट्रभाव जागवण्याचे कार्य संघाने केल्याचे प्रतिपादन राज्य माहिती आयुक्त गजानन निमदेव यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांत प्रचार विभागाच्या वतीने मासिक जागरण पत्रिका-विदर्भ हुंकारच्या ‘समर्पणाचा शतकोत्सव’ या शताब्दी वर्ष विशेषांकाचे विमोचन करण्यात आले. स्मृतिभवन रेशीमबाग परिसरातील दत्तोपंत ठेंगडी सभागृहात पार पडलेल्या या समारंभात व्यासपीठावर विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, मुख्य अतिथी म्हणून राज्य माहिती आयुक्त (नागपूर खंडपीठ) गजानन निमदेव, महानगर सहकार्यवाह दिनेश गौर आणि नागपूर महानगर प्रचार प्रमुख ब्रजेश मानस उपस्थित होते. या अंकाचे संपादन विश्व संवाद केंद्राचे प्रमुख आणि ‘विदर्भ हुंकार’चे संपादक चारुदत्त कहू यांनी केले असून, संपादन सहाय्य प्रसाद बरवे यांनी केले आहे.
मुख्य अतिथी गजानन निमदेव म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ‘विदर्भ हुंकार’च्या विशेषांकाचे प्रकाशन होणे, ही आनंदाची बाब आहे. 1925 साली डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत संघाची स्थापना केली. हिंदू समाजाचे संघटन, सांस्कृतिक राष्ट्रवादाची उपासना आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची भावना या उद्देशाने सुरू झालेला संघ आज जगातील सर्वात मोठी, शिस्तबद्ध आणि स्वयंसेवकांवर आधारलेली संघटना म्हणून ओळखला जातो.
स्वयंसेवकांचा त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेमुळे हा शंभर वर्षांचा प्रवास प्रेरणादायी ठरला असून, अखंड भारत व विश्वबंधुत्वाच्या संकल्पनेचा हा प्रवास येणाऱ्या काळात अधिक बळकट होण्याचा विश्वासही गजानन निमदेव यांनी व्यक्त केला. संघ संविधान विरोधी असल्याची टीका निरर्थक असून, संविधानाचे काटेकोरपणे पालन करणारी संघासारखी दुसरी कुठलीही संघटना भारतात अस्तित्वात नसल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले. संघाच्या प्रचारकांनी समर्पित भावनेने केलेल्या कार्यामुळे पूर्वोत्तरातील राज्यांची भारताशी नाळ जुळून राहिल्याचा तसेच केरळ आणि त्रिपुरा राज्यांमध्ये हिंदुत्वाच्या विचारांचा होणारा विजय केवळ संघामुळेच शक्य झाल्याचा उल्लेखही त्यांनी गौरवाने केला.
प्रमुख वक्ते संघाचे महानगर सहकार्यवाह दिनेश गौर याप्रसंगी बोलताना म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने समाज परिवर्तनासाठी पंचपरिवर्तन ही संकल्पना मांडली आहे. सामाजिक समरसता, कुटुंबप्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्वदेशीचा आग्रह आणि नागरिक कर्तव्यबोध हे पंचपरिवर्तनाचे आधारस्तंभ आहेत. या मूल्यांची अंमलबजावणी स्वयंसेवक आपल्या दैनंदिन जीवनातून करतात. निःस्वार्थ सेवा, शिस्त, त्याग आणि राष्ट्रनिष्ठा हे स्वयंसेवकांच्या समर्पणाचे प्रमुख गुण आहेत. समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून सकारात्मक परिवर्तन घडवणे हेच संघकार्याचे मुख्य ध्येय आहे. संघातील मातृशक्ती आणि परिवाराचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.
भारतमाता पुजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. प्रांजली देव-वराडपांडे यांनी वंदे मातरम् गायले. सूत्रसंचालन दीनदयाल नगर प्रचार प्रमुख स्वप्निल येरपुडे यांनी तर आभार प्रदर्शन अयोध्यानगर प्रचार प्रमुख डॉ. श्रेयस ओहळे यांनी केले.
‘समर्पणाचा शतकोत्सव’ या विशेषांकात संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाले, अ.भा. प्रचार टोळी सदस्य मुकुल जी कानेटकर, अ, भा. सहप्रचार प्रमुख नरेंद्र ठाकूर, संघ विचारक रतन शारदा, ऑर्गनायझरचे संपादक प्रफुल्ल केतकर राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका चित्रा जोशी, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे यांच्यासह 20 मान्यवरांच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील लेखांचा समावेश आहे.

