Wednesday, December 31st, 2025

कराड येथे बंधुता परिषदेचे आयोजन

कराड, दि. ३१ डिसेंबर : दिनांक २ जानेवारी १९४० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेस भेट दिली होती या ऐतिहासिक भेटीचे स्मरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकात्मतेचा संदेश समाजात रुजावा यासाठी त्याच ठिकाणी म्हणजे कराड शहरातील संघाच्या भवानी शाखेच्या मैदानावर बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेचे आयोजक लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड यांच्या वतीने ही माहिती देण्यात आली.

या बंधुता परिषदेसाठी विशेष अतिथी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज आणि महाराष्ट्र सरकारचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

या परिषदेमध्ये प्रमुख वक्ते म्हणून भारत सरकारच्या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष किशोर मकवाना उपस्थित राहणार आहेत. तसेच दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांची या परिषदेसाठी विचार मंचावर विशेष उपस्थिती राहणार आहे. यासोबतच समाजातील वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनांचे प्रतिनिधी आणि मान्यवर या परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत.

ज्या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संघ शाखेत भेट दिली त्याच ऐतिहासिक भवानी संघस्थानावर २ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता भवानी मैदान, पंतांचा कोट, सोमवार पेठ, कराड येथे ही विचार परिषद होणार आहे. समाजात एकता, बंधुता व समतेचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला विचार रुजावा यासाठी आयोजित केलेल्या या बंधुता परिषद २०२६ च्या वैचारिक कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन लोककल्याण मंडळ ट्रस्ट, कराड च्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *