रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापनदिन साजरा होणार जल्लोषात

अयोध्या, १३ डिसेंबर : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बैठकीत श्री रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनी अर्थात प्रतिष्ठा द्वादशीनिमित्त अयोध्येत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगद टीला येथे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये राम कथा, अनुप जलोटा, सुरेश वाडकर आणि तृप्ती शाक्य यांचे भजन तसेच कथक नृत्य नाटक यांचा समावेश आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या आज झालेल्या बैठकीत याबद्दल चर्चा करण्यात आली.

ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मणिराम दासजींच्या शिबिरात आठ सदस्य ऑनलाइन बैठकीत सामील झाले आणि सहा सदस्य उपस्थित होते. विशेष निमंत्रितांमध्ये विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक दिनेश चंद्र, मंदिर बांधकाम व्यवस्थेत सहभागी असलेले गोपाल जी आणि आंतरराष्ट्रीय श्री राम कथा संग्रहालयाचे संजीव सिंह यांचा समावेश होता.

नंतर, ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय, सदस्य महंत दिनेंद्र दास, कृष्ण मोहन आणि डॉ. अनिल मिश्रा यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयांची पत्रकारांना माहिती दिली.

प्राण प्रतिष्ठेपूर्वी भगवान श्री राम ज्या ठिकाणी राहिले होते त्या ठिकाणी एक मंदिर बांधले जात आहे आणि जवळच एक शहीद स्मारक बांधले जात आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले. या दिवशी कुंभमेळ्यासारखी गर्दी वाढल्यास त्यानुसार पादत्राणे ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एकाच वेळी पंचवीस हजार भाविक त्या व्यवस्थेचा वापरू शकणार आहेत. अशा प्रकारची व्यवस्था दिवसातून सात वेळा होऊ शकते. तसेच सीमा भिंतीच्या बांधकामात सुरक्षा यंत्रणांशी सल्लामसलत करून काम केले जात असल्याचे चंपत राय यांनी सांगितले.

त्यांनी सांगितले की, २७ ते ३१ डिसेंबर या कालावधीत मंडळ पूजा होणार आहे. कानपूरचा एक गट संगीतमय अखंड पारायण सादर करेल. श्री राम गुणगान करण्यात विविध कवी देखील सहभागी होतील. दिल्लीचे जगदीश मित्तल त्याचे समन्वय साधतील.

मंदिराच्या बांधकामात छोट्या कामात गुंतलेल्या कामगारांना १९ मार्च रोजी हिंदू नववर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सन्मानित केले जाईल. त्यांची संख्या सुमारे चारशे असू शकते असे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *