पंचपरिवर्तनातून समाजपरिवर्तन होईल: अरविंद कुकडे

नागपूरच्या अयोध्या भागाच्या वतीने प्रमुख जनसंगोष्टी

नागपूर, 7 डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित प्रमुख जनसंगोष्टी कार्यक्रमात विदर्भ प्रांत सह–संपर्क प्रमुख अरविंद कुकडे यांनी समाज परिवर्तनासाठी ‘पंचपरिवर्तन’ संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. संघटनेच्या 100 वर्षांच्या वाटचालीत समाजातील विविध घटकांनी संघाच्या विचारधारेचा स्वीकार करून एकात्मता, संस्कार आणि राष्ट्रीय भावनेची जपणूक करतानाच पंचपरिवर्तनाचे पालन केले तर समाज परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हुडकेश्वर येथील स्वामी समर्थ सभागृहात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्या भागाच्या वतीने प्रमुख जनसंगोष्टी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर संस्कार भारतीचे अखिल भारतीय मंत्री आशुतोष अडोणी, अयोध्या भाग संघचालक मनोहर सपकाळ व प्रमुख जनसंगोष्टी संयोजिका कीर्ती वनकर उपस्थित होत्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली, त्यानंतर सामूहित “वंदे मातरम” झाले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात मनोहर सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रमुख जन संगोष्टी कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा अनुभव आणि विचार मांडले. कार्यक्रमाचे उद्दिष्ट समाजातील विविध क्षेत्रातील परस्पर संबंध आणि समन्वय साधणे हे असल्याचे सांगितले. संघाचे कार्य समाजाचे एकत्रीकरण साधण्याचे असून, व्यक्ती, कुटुंब आणि राष्ट्र यामध्ये सुसंवाद निर्माण करणे महत्त्वाचे आहे. आजचे तंत्रज्ञान, कुटुंबव्यवस्था, पर्यावरण आणि सांस्कृतिक आव्हानांवर चर्चा होऊन, राष्ट्रकार्याला नव्या दिशा मिळवण्यावर भर देण्यात आल्याचेही सपकाळ यांनी प्रास्ताविकात सांगितले.

पंचपरिवर्तनाबद्दल बोलतांना अरविंद कुकडे म्हणाले की, कुटुंब व्यवस्थेतील आदर्श मूल्ये, महिलांचा सन्मान, संस्कारांची जपणूक आणि एकतेची भावना समाजपरिवर्तनाचे प्रमुख घटक आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि वेगाने बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे पारंपरिक मूल्यांचे संरक्षण अधिक आवश्यक झाल्याचे त्यांनी अधोरेखित केले. समाजातील जात, भाषा, प्रांत अशा विभाजनांपलीकडे जाऊन समरसतेची भावना निर्माण करणे ही आजची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड काळातील स्वच्छता कामगारांच्या सेवाभावाचा उल्लेख करताना, समाजाने प्रत्येक कार्याची समान प्रतिष्ठा मान्य करण्याची गरजही त्यांनी मांडली. नागरिक कर्तव्यांचे पालन, स्वदेशीचा आग्रह, पर्यावरण संरक्षण आणि आत्मविश्वासपूर्ण समाजनिर्मिती हे आगामी काळातील महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. “समाज एकत्र आला तर देश बलशाली होतो,” असे सांगत शताब्दी वर्ष विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग दाखवणारे ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

राष्ट्रीय एकात्मता दृढ करणे हे संघाचे कार्य : अडोणी

आशुतोष अडोणी यांनी भारतीय राष्ट्रवाद, संघाची स्थापना आणि कार्यप्रणालीवर चर्चा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि डॉ. हेडगेवार यांच्या कार्यावर प्रकाश टाकत त्यांनी भारतीय संविधानातील मूल्यांशी राष्ट्रवादाच्या ध्येयधोरणांचा संबंध स्पष्ट केला. संघ विविध समाजघटकांना एकत्र आणत राष्ट्रीय एकात्मता दृढ करण्याचे कार्य सातत्याने करत असल्याचे ते म्हणाले. भारतातील विविध बोलीभाषा, संस्कृती आणि धर्म यांतील वैविध्यच राष्ट्राची खरी शक्ती असल्याचा उल्लेख त्यांनी केला. ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ या तत्त्वज्ञानावर आधारित संस्कारांनी प्रेरित होऊन देशसेवा ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भारतीय संस्कृतीतील समन्वयशीलतेचा गोडवा सांगताना अडोणी यांनी विविधतेतून एकात्मतेचा संदेश मांडला.

वक्त्यांनी उपस्थितांच्या प्रश्नोत्तरांचेही समाधान केले. कार्यक्रमात सेवा विभागाच्या वतीने सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य व प्रचार विभागाचा संघ साहित्य स्टॉल लावण्यात आला होता. उपस्थित प्रेक्षकांनी कार्यक्रमाला उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *