आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव:’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव:’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशपातळीवरील शुभारंभ राजभवन, गांधीनगर (गुजरात) येथून दूरदृश्य संवाद पद्धतीने केला. त्यानंतर ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राज्यस्तरीय कार्यारंभ दिन कार्यक्रमाचे सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, राज्यात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना भक्कम आधार देण्यात आला. गेल्या वर्षभरात १०० कोटींपेक्षा जास्त मदत देण्यात आली आहे. सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रितपणे २ कोटी कार्डांचे वाटप करण्यात येणार आहे. आता ५ लाखांपर्यंत आरोग्य संरक्षण मिळणार आहे. महाराष्ट्र आरोग्याच्या क्षेत्रात देशात अग्रेसर असून सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक योजना आणि उपक्रम राबविले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. आयुष्मान कार्डच्या माध्यमातून सामान्यांना वेळेत वैद्यकीय उपचार घेणे शक्य होणार असून यासाठी “आयुष्मान भव” ही महत्वाकांक्षी मोहीम १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविली जाणार आहे. मोहिमेत पात्र लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड नोंदणी करून त्याचे वितरण करण्यात येणार आहे.
मा. राज्यपालांच्या हस्ते 'आयुष्यमान भव:' राज्यस्तरीय मोहिमेचा शुभारंभ | उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार | मुंबई https://t.co/iNlbsJb6PG
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 13, 2023
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ही मोहीम राबवताना गावपातळीपर्यंत गुणवत्तापूर्वक आरोग्य सेवा देणे गरजेचे आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा, अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी, रक्तदान मोहीम, अवयवदान जागृती मोहीम, स्वच्छता मोहीम, १८ वर्षांवरील पुरुषांची आरोग्य तपासणी अशा मोहीमा राबविण्यात येतील. राज्य शासनाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना वैद्यकीय सेवा, तपासणी नि:शुल्क करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षामार्फत गेल्या वर्षभरात ११२ कोटीपेक्षा जास्त मदत केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
आयुष्यमान ग्रामसभा 2 ऑक्टोंबर रोजी होणार असून ती ‘आयुष्मान भारत’ आरोग्य योजनेच्या जाणीव जागृतीसाठी महत्वपूर्ण ठरणार आहे. आयुष्मान ग्राम सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी त्याचबरोबर यापूर्वी ज्या लाभार्थ्याने आयुष्मान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे, अशा लाभार्थ्यांची यादी आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत संलग्नित असेलल्या रुग्णालयांची यादी अद्ययावत असावी, अशा सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.