राष्ट्रसेवा आणि राष्ट्रीय सुरक्षेतील अतुलनीय योगदानाचा सन्मान!

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

पुणे, दि. 1 ऑगस्ट : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री उदय सामंत, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार रविंद्र चव्हाण, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. रोहित टिळक व इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, आज सर्वांकरिता अतिशय आनंदाचा दिवस आहे. देशातील अनेक मान्यवरांचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. यंदा हा पुरस्कार राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा देणाऱ्या आणि त्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या क्षेत्रात ज्यांना ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाते, त्या अजित डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी राजकीय क्षेत्रातील ‘चाणक्य’ येथे उपस्थित आहेत.

अजित डोवाल यांनी प्रथम पोलीस सेवेत, त्यानंतर इंटेलिजन्स ब्युरो (आयबी) आणि रिसर्च अँड ॲनालिसिस विंगच्या (R&AW) माध्यमातून देशासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले. विशेषतः 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित डोवाल यांची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर त्यांनी देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणण्याचे काम केले. अजित डोवाल यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी आखलेल्या रणनीतीमुळे भारत आता शत्रूच्या भूमीत घुसून प्रत्युत्तर देणारा देश बनला आहे. अजित डोवाल यांनी अनेकदा स्वतःचा जीव धोक्यात घालून देशासाठी कार्य केले, मात्र त्यासाठी कधीही कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा ठेवली नाही. अशा व्यक्तिमत्त्वाला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान होत असल्याचा अत्यंत आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतात राष्ट्रवादाची मुहूर्तमेढ रोवण्याचे कार्य समाजसुधारक आणि थोर क्रांतिकारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केले. त्यामुळे त्यांना भारतीय राष्ट्रवादाचे जनक म्हटले जाते. भारत ब्रिटिशांच्या गुलामीत असताना लोकमान्य टिळक यांनी भारतीयांची मानसिकता बदलून त्यांच्या मनामध्ये देशभक्तीची भावना जागवली. आपला समाज धार्मिक व आध्यात्मिक असल्याने समाजाला एकत्र आणण्यासाठी त्यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. बहुजन समाजाला एकत्रित करून स्वातंत्र्यलढ्याला व्यापक लोकचळवळीचे स्वरूप दिले. तसेच सार्वजनिक शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून तरुणांना राष्ट्रभक्ती आणि स्वाभिमानाची प्रेरणा दिली. अशाच समर्पणाने आणि देशभक्तीच्या भावनेने आयुष्यभर राष्ट्रसेवा करणाऱ्या अजित डोवाल यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याचा आनंद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *