राष्ट्रनिर्मितीत भारतीय स्त्रीचे योगदान कायमच अनमोल : लीना गहाणे

राष्ट्र सेविका समितिच्या प्रवेश व प्रबोध वर्गाचा समारोप संपन्न

छ. संभाजीनगर, दि. 30 मे : भारताचा मूळ स्वभाव, भारताने जगाला दिलेल्या योग, अध्यात्म आणि तत्वज्ञान या महत्त्वपूर्ण देणग्या आणि संपूर्ण विश्व हे कुटुंब असून तिथे शांतता समृद्धी नांदली पाहिजे व त्यासाठी प्रत्येकाला आपले कर्तव्य निभावणे आवश्यक आहे या उदात्त विचाराने आंतरराष्ट्रीय पातळीवर पावले टाकणारा भारत हा विश्वगुरूत्वाकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या अखिल भारतीय सह बौद्धिक प्रमुख लीनाताई गहाणे यांनी केले. राष्ट्र सेविका समितिच्या प्रवेश व प्रबोध शिक्षा वर्गाचा समारोप आज पार पडला. त्यावेळी ‘जाग उठा है आज देश का वह सोया अभिमान’ या विषयावर उद्बोधन करताना त्या बोलत होत्या. छत्रपती संभाजीनगर येथील डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या रामचंद्र मेडिकल इन्स्टिट्यूटच्या भव्य प्रांगणात हा समारोप सोहळा पार पडला.

भारतीय समाजाने महिला स्वातंत्र्य, महिला शिक्षण ह्याला मागे टाकलेले नाही. वेदकाळातील ऋषिकांपासून ते मंगलयानातील महिला शास्त्रज्ञ यांच्यापर्यंत आपल्याला हे दिसून येते. स्त्री ही कुटुंबाचा परत्वे समाजाचा आधार स्तंभ आहे असे अत्यंत प्रभावी, राष्ट्रनिष्ठ, ओघवत्या शैलीत विचार मांडून लीनाताई गहाणे यांनी उपस्थितांना संबोधित केले.

राष्ट्र सेविका समितिच्या दिनांक 15 मे पासून सुरू झालेल्या या पंधरा दिवसीय प्रवेश व प्रबोध वर्गाचा समारोप समारंभ उत्साहात संपन्न झाला. प्रारंभी प्रतिमा पूजन व भगव्या ध्वजाचे अनावरण झाले. त्यांनंतर शिक्षार्थी सेविकांनी मानवंदना, घोष, गणसमता, नियुद्ध, दंड, यष्टी, योगचाप, व्यायाम योग यांची अत्यंत देखणी प्रात्यक्षिके सादर केली. महिला ही मन आणि मनगट यांनी सक्षम बनून ती राष्ट्रभक्त नागरिक घडली पाहिजे यासाठी समिति प्रयत्न करते असे प्रतिपादन समितिच्या देवगिरी प्रांताच्या सहकार्यवाहिका अंजली बडवे यांनी केले.

याप्रसंगी आर के दमाणी मेडिकल काॅलेजच्या अधिष्ठाता डाॅ. शिरडकर यांनी बोलताना समिति कार्याची सांप्रत काळातील आवश्यकता प्रतिपादन करताना या मुली देशाच्या उज्वल भवितव्यात आपले भरभरून योगदान देतील असे मनोगत व्यक्त केले.

प्रवेश वर्गाचा अहवाल सर्वाधिकारी म्हणून संघमित्रा कापडी यांनी तर प्रबोध वर्गाचा अहवाल राधिका भिडे यांनी सादर केला. या शिक्षा वर्गात प्रवेश वर्गासाठी 71 तर प्रबोध वर्गासाठी 63 तरूणी उपस्थित होत्या. समारोप कार्यक्रमास संभाजीनगर शहरातील नागरिक, रा. स्वं.संघ पदाधिकारी तसेच स्वयंसेवक, सेविका बहुसंख्येने उपस्थित होते. संपूर्ण वंदे मातरम गीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

15 दिवसांच्या ह्या वर्गात मुलींना मन-मनगट मजबूत करण्यासोबतच देशभक्तीचे संस्कार देऊन सज्जन शक्ती निर्माण करण्याचा उद्देश होता. विशेष ह्या वर्गात मातृहस्तेन भोजन हा वेगळा उपक्रम झाला. तसेच उल्कानगरी ह्या भागात सघोष पथसंचलन निघाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *