
मुंबई, दि. 5 जून : ‘राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा’ (NEET) देणाऱ्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पारदर्शक आणि तणावरहित वातावरण असावे. सर्व यंत्रणांनी सतर्क राहून परीक्षा केंद्रांवर आवश्यक उपाययोजना कराव्यात आणि कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, यासाठी अधिक दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज वर्षा निवासस्थान, मुंबई येथे ‘नीट’ परीक्षेच्या पूर्वतयारीसंदर्भात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सर्व परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवून त्यावर प्रभावी देखरेख ठेवावी, तसेच सायबर सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची तपासणी व ओळख पडताळणी प्रक्रिया काटेकोरपणे राबवावी. परीक्षेसंदर्भातील अचूक माहिती विद्यार्थी, पालक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करून व्यापक जनजागृती करण्यात यावी. तसेच, परीक्षा प्रक्रियेबाबत अफवा किंवा दिशाभूल करणारी माहिती प्रसारित झाल्यास त्याचा तातडीने खुलासा करून विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनात कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही, याची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
पुणे आणि लातूर येथील परीक्षा केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात यावे, परीक्षा केंद्रांवर कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये, याची दक्षता घेण्याबरोबरच सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन, वीजपुरवठा, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा, पावसाच्या दृष्टीने पूर्वतयारी आणि विद्यार्थ्यांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची प्रभावी अंमलबजावणी करून परीक्षेच्या दिवशी विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होणार नाही, यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, शिक्षण विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

