हिंदू समाजाने आता मौन सोडून हिंमत दाखवण्याची वेळ आली आहे : धायरकर

सासवडच्या ‘विराट हिंदू संमेलना’त वक्त्यांचे रोखठोक आवाहन

 

सासवड, 29 एप्रिल : देशाची फाळणी हिंदू, शीख, बौद्ध किंवा जैन बांधवांच्या मनात नसतानाही केवळ एका विशिष्ट विचारसरणीच्या हट्टापायी स्वतंत्र देशाची मागणी झाली आणि त्यात लाखो हिंदुंना आपला जीव गमवावा लागला. इतिहासातील या वेदनादायी घटनांपासून ते वर्तमानातील ज्वलंत प्रश्नांपर्यंत अनेक मुद्द्यांवर आता आपण आपल्या मुस्लिम बांधवांना जाब विचारणार आहोत की नाही, असा जळजळीत सवाल सासवड येथे आयोजित ‘विराट हिंदू संमेलना’त विवेक विचार मंचचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक निलेश धायरकर यांनी उपस्थित केला. हिंदू समाजाने आता मौन सोडून हिंमत दाखवण्याची वेळ आली आहे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

सासवड येथे नुकत्याच झालेल्या विराट संमेलनात शेकडो नागरिक उपस्थित होते. यावेळी धायरकर यांनी इतिहासातील अनेक संदर्भांचा दाखला देत उपस्थितांना विविध विषयावर विचार करायला भाग पाडले. काश्मीरमधील दहशतवादामुळे विस्थापित व्हावे लागलेल्या काश्मिरी पंडितांचा नेमका दोष काय होता आणि त्यांना स्वतःच्याच देशात निर्वासित म्हणून का जगावे लागले, असा प्रश्न त्यांनी मांडला. तसेच, ईशान्य भारतातील बांगलादेशी घुसखोरीवर भाष्य करताना, या घुसखोरांना कागदपत्रे उपलब्ध करून देणारे कोण आहेत, याचा शोध घेऊन त्यांना प्रश्न विचारण्याचे आवाहन करण्यात आले.

सांस्कृतिक आक्रमणांचा उल्लेख करताना तालिबानी मानसिकतेवरही कडाडून टीका करण्यात आली. शांतीचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या भव्य मूर्ती फोडणाऱ्या विचारसरणीला ‘तथागत’ का नको आहेत, असा सवाल उपस्थित करत त्यांनी गोध्रा हत्याकांड आणि २०१२ मध्ये मुंबईत आझाद मैदानावर ‘अमर जवान’ स्मारकाची विटंबना करणाऱ्या गुंडांच्या वृत्तीचा तीव्र निषेध केला. या देशातील मुस्लिम समाजाने औरंगजेब, टिपू सुलतान किंवा अफजलखान यांसारख्या संस्कृतीविरोधी राज्यकर्त्यांना आदर्श न मानता डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, वीर अब्दुल हमीद, अशफाक उल्ला खान आणि समाजसुधारक हमीद दलवाई यांना आपले आदर्श मानले पाहिजे, असेही ठामपणे सांगितले.

ह.भ.प. गणेश महाराज वाघले यांनी हिंदू धर्माचे महत्त्व आणि सांस्कृतिक वारसा यावर प्रबोधन केले. जागृती आयाचित यांनी ‘लव्ह जिहाद’च्या वाढत्या धोक्यांबद्दल उपस्थित जनसमुदायाला वास्तव माहिती दिली. हिंदू समाजाने संघटित होऊन आपल्या अस्मितेसाठी आणि सुरक्षिततेसाठी सजग राहणे काळाची गरज असल्याचे या संमेलनाच्या माध्यमातून अधोरेखित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *