देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट : देवेंद्र फडणवीस

दुग्ध गुणवत्ता अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर; एआय आधारित यंत्रणेला चालना!

मुंबई, दि. 23 एप्रिल : राज्यात सध्या सुमारे 40% दूध संघटित क्षेत्रातून प्रक्रिया केले जाते, तर उर्वरित दूध असंघटित क्षेत्रातून येते. त्यामुळे अधिकाधिक उत्पादक आणि गावांना संघटित डेअरी व्यवस्थेत समाविष्ट करण्यावर शासनाचा भर आहे. देशभरात 75,000 नवीन गावे सहकारी व्यवस्थेत जोडण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून, यामुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळण्यासोबतच गुणवत्ता व्यवस्थापन अधिक सक्षम होणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे राष्ट्रीय दुग्ध विकास महामंडळाची (NDDB) बैठक झाली. यावेळी महानंद प्रकल्प व भविष्यातील योजनांसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.

राज्यात दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाने टेस्ट स्ट्रिप विकसित केली आहे. यासोबतच गुणवत्ता तपासणी अधिक प्रभावी करण्यासाठी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड व आयआयटी यांच्या सहकार्याने कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित यंत्रणा विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

दूध गुणवत्ता तपासणीसाठी विकसित करण्यात आलेली टेस्ट स्ट्रिप यूरिया तसेच इतर घटक ओळखण्यास सक्षम असून, पुढील 6 महिन्यांत ती पूर्णपणे कार्यान्वित होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

यावेळी राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे अध्यक्ष मीनेश शाह व इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *