परमहंस नगर हिंदू संमेलनाला प्रचंड प्रतिसाद, हजारोंच्या संख्येने नागरिकांची उपस्थिती

पुणे, दि. २४ मार्च : स्वातंत्र्यानंतर ७९ वर्षांनंतरही हिंदूराष्ट्र असलेल्या भारतातील हिंदूंना आपल्या अस्तित्वासाठी लढावे लागत आहे यापेक्षा दुसरे दुर्दैव नाही. हिंदूंना सातत्याने जागे करावे लागते. ते हिंदू असल्याचे सांगावे लागते. त्यामुळे जोपर्यंत हिंदू समाज जागा होत नाही तोपर्यंत अशी हिंदू संमेलने आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ मराठी रंगकर्मी व चित्रपट अभिनेते शरद पोंक्षे यांनी व्यक्त केले. कोथरूड परिसरातील परमहंस नगर येथे सकल हिंदू समाजाद्वारा आयोजित विराट हिंदू संमेलनानिमित्त तीन दिवसीय व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातील पहिले पुष्प आज पोंक्षे यांनी गोवले. यावेळी संघाच्या परमहंस नगराचे संघचालक हिरामण जगताप, स्थानिक नगरसेविका ज्योत्स्ना कुलकर्णी, मनीषा बुटाला, नगरसेवक पृथ्वीराज सुतार, दिनेश माथवड, भाजप नेते जगन्नाथ कुलकर्णी, डॉ. संदीप बुटाला, कार्यक्रमाचे आयोजक उद्योजक दिलीप चोरघे, नथाराम राठोड यांच्यासह हिंदुत्त्ववादी कार्यकर्ते व हजारोंच्या संख्येने हिंदू नागरिक उपस्थित होते.
भारतावर सातत्याने आक्रमणे झाली. त्यामुळे हिंदूंच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला. ब्रिटिशांनी हिंदूंना आपल्या इतिहासापासून, संस्कृतीपासून, भाषेपासून तोडले. इंग्रजी आपल्यावर लादली. त्यामुळे हिंदूंना आपल्याच संस्कृतीची, धर्माची लाज वाटायला लागली. ब्रिटिशांनी हिंदूंपासून शस्त्र तोडलं. फक्त देवीदेवतांच्या हातात शस्त्र आहेत. पण हिंदूंच्या हातात शस्त्र नाहीत. त्यातच स्वातंत्र्यानंतर आलेल्या काँग्रेसने अहिंसेच्या नावाखाली हिंदूंना दुबळे, घाबरट बनवले. हिंदू समाजाचे सर्वाधिक नुकसान कांग्रेसने केले असे पोंक्षे यावेळी बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले, २०२४ च्या निवडणुकीत आपण काठावर पास झालो. अन्यथा आपली धडगत नव्हती. कुंभकर्णापेक्षाही हिंदू समाजाची झोप अधिक आहे. भारत हिंदूराष्ट्र होता, आहे आणि राहील असे नुसता तोंडाने म्हणून उपयोगी नाही. प्रत्यक्ष अधिकृतरित्या भारत हिंदूराष्ट्र घोषित व्हायला हवा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
भारतीय शिक्षणपद्धती एक आदर्श शिक्षणपद्धती होती याकडे लक्ष वेधताना त्यांनी सांगितले की भारतात सर्व वर्ण समान समजले गेले आहेत. ब्राह्मण श्रेष्ठ किंवा शूद्र कनिष्ठ असे कधीच नव्हते. सर्वांशी प्रेमाने वागणे, माणुसकीने वागणे हा मानवधर्मच हिंदू धर्म आहे. संपूर्ण विश्वासाठी प्रार्थना करणारा हिंदू धर्म आहे. मात्र ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक फोडा आणि झोडा या नीतिअंतर्गत जातीभेद निर्माण केले.
आर्थिक नाकाबंदी हे सर्वसामान्य हिंदूंचे शस्त्र –
एकेकाळी १०० टक्के हिंदू असलेले काश्मीर आज १०० टक्के मुस्लिम झाले आहे. हिंदूंनी जागरूक असणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळे, सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, रिक्षा, टॅक्सीवाले असे सर्व हिंदूच असतील याची खात्री करून मगच आर्थिक व्यवहार करा. हलाल सर्टिफिकेट असलेल्या वस्तूंवर बहिष्कार घाला. शेजारच्या घरातील मुलगी लव जिहादमध्ये बळी पडली, पण आपल्या घरातील मुलगी सुरक्षित आहे म्हणून शांत बसू नका असे पोंक्षे यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कुंदा पानसे भजनी मंडळातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला गेला. तर सुकृती कथ्थक डान्स अकॅडमीतर्फे गणेश वंदना सादर केली गेली. सुनील ढोले यांनी सूत्रसंचालन केले.

