
मुंबई, दि. 24 मार्च : पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक 548-डी राष्ट्रीय महामार्गावरील 0 ते 26 किलोमीटर दरम्यान 4 पदरी उन्नत आणि 4 पदरी जमिनीस समांतर महामार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सुलभ दळणवळणासाठी महामार्गाचे जाळे विकसित करण्याचे निर्देश दिले.
तळेगाव ते चाकण महामार्गासह याच महामार्गावर चाकण ते शिक्रापूर दरम्यान पुढे 26 ते 43 किलोमीटर लांबीमध्ये 4 पदरी जमिनीस समांतर महामार्गाची डीएफबीओटी (डिझाईन, फायनान्स, बिल्ट, ऑपरेट ॲन्ड ट्रान्सफर) पद्धतीने सुधारणा करण्यास मान्यता देण्यात आली.
दरम्यान यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांमुळे येथे निश्चितच औद्योगिक विकासास मदत होणार आहे. पुणे शहर परिसराची वाहतूक कोंडीतून सुटका होण्यासाठी महामार्गाची कामे होणे अत्यंत गरजेचे आहे.
या महामार्गाची कामे पूर्ण झाल्यानंतर चाकण औद्योगिक वसाहतीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे ही कामे दर्जेदार व विहित कालमर्यादेत पूर्ण करावी, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

