हिंगणे परिसरात विराट ‘हिंदू संमेलन’ संपन्न
‘तीर्थ शिवराय’ कार्यक्रमाने भारावले पुणेकर

पुणे, दिनांक 8 मार्च : “राष्ट्राचे संरक्षण आणि प्रगती या दोन्हीचा विचार करणारी नित्य सिद्ध चारित्र्यवान शक्ती निर्माण करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. विस्मृतीत गेलेली हिंदू ही आपली खरी ओळख पुन्हा जागृत करण्याचे कार्य संघाने गेल्या 100 वर्षांत सातत्याने केले असून, सद्यस्थितीतील सामाजिक आव्हानांवर हिंदुत्व जागृती हेच एकमेव उत्तर आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभ्यासक अभय ठकार यांनी केले.
सिंहगड रस्ता परिसरातील हिंगणे खुर्द येथे ‘अखिल हिंदू समाज’च्या वतीने आयोजित विराट ‘हिंदू संमेलना’त ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भागवताचार्य पं. अतुलशास्त्री भगरे आणि माया गोविंद कुलकर्णी उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनात अभय ठकार यांनी संघाच्या स्थापनेपासूनचा इतिहास मांडला. ते म्हणाले, “1925 पासून सुरू झालेला हा प्रवास आज प्रत्येक प्रांतात पोहोचला आहे. फाळणीच्या काळात स्वयंसेवकांनी लाखो हिंदूंचे प्राण वाचवले, तर आणीबाणीविरुद्ध लढा देऊन देशाची लोकशाही टिकवून ठेवली. लातूरचा भूकंप असो वा कोव्हिड काळ, स्वयंसेवक नेहमीच मदतीला धावून जातात. आजच्या काळात लहान कुटुंबे, नैराश्य आणि लोकसंख्येचे असंतुलन यांसारख्या प्रश्नांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने या राष्ट्रकार्यात सहभागी व्हायला हवे.”
पं. अतुलशास्त्री भगरे यांनी ‘आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म’ ही मूळ संकल्पना स्पष्ट केली. “छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र गायन आणि नृत्यातून सांगणारे ‘तीर्थ शिवराय’ सारखे अभिनव कार्यक्रम घराघरांत पोहोचले पाहिजेत, तरच शिवरायांच्या गुणांचे अनुकरण करणारा समाज घडेल,” असे मत त्यांनी व्यक्त केले. माया कुलकर्णी यांनी पंचपरिवर्तनातील स्वबोध, नागरी शिष्टाचार, सामाजिक समरसता, पर्यावरण आणि कुटुंब प्रबोधन या पाच सूत्रांवर उदाहरणांसह प्रकाश टाकला.
‘तीर्थ शिवराय’ आणि अवधूत गांधींचे सादरीकरण :
संमेलनाचे मुख्य आकर्षण ‘तीर्थ शिवराय’ हा संगीत-नाट्य-नृत्यमय कार्यक्रम ठरला. जीवन धर्माधिकारी यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि कथक गुरू डॉ. नीलिमा देशपांडे यांनी दिग्दर्शित केलेल्या या आविष्काराने प्रेक्षक भारावून गेले. सुप्रसिद्ध गायक अवधूत गांधी (आळंदीकर) यांनी सादर केलेल्या पोवाड्यांनी आणि गीतांनी वातावरणात मोठा उत्साह निर्माण केला. ईशावस्य गुरुकुलमच्या 30 नृत्य साधकांनी शिवचरित्रातील महत्त्वाचे प्रसंग जिवंत केले.
कार्यक्रमाची सुरुवात भारतमाता पूजन, रामशिळा पूजन आणि ‘केशव शंखनाद पथका’च्या शंखनादाने मंगलमय वातावरणात झाली. हिंगणे आणि सिंहगड रस्ता परिसरातील सुमारे 1100 ते 1200 नागरिक या संमेलनास उपस्थित होते. कार्यक्रमासाठी फिरते स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय करण्यात आली होती.
यावेळी शरद जगताप, नगरसेवक श्रीकांत जगताप, प्रसन्न जगताप, सचिन मोरे आणि श्रीमती ज्योती गोसावी हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन निलेश भिसे यांनी केले. भगवे ध्वज, आकर्षक रांगोळ्या आणि लाडू प्रसादाच्या वाटपाने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि राष्ट्रप्रेमाने न्हाऊन निघाला होता.

