प्रगत उत्पादन क्षमतेच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल : मुख्यमंत्री

 

नागपूर, दि. 7 मार्च : राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. प्रगत उत्पादन क्षमतेच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज नागपूर येथे ‘XSIO एडवांस्ड इंडस्ट्रियल पार्कच्या शुभारंभ’ कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांनी ‘XSIO एडवांस्ड इंडस्ट्रियल पार्क’चे भूमीपूजन व कोनशिला अनावरण केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार डॉ. आशिष देशमुख आणि आमदार चरणसिंह ठाकूर, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, एक्सएसआयओ इंडस्ट्रीयल ॲण्ड लॉजिस्टिक पार्कचे व्यवस्थापकीय संचालक आशिष अग्रवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, भारतासारख्या लोकशाही देशाला ग्लोबल सप्लाय चेन मध्ये सशक्तपणे उभे करण्यासाठी निर्मिती क्षेत्र अधिक बळकट करणे गरजेचे आहे. यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाला विकसित करण्याचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण होऊ शकेल. महाराष्ट्र शासनानेही या दिशेने पुढे जाण्यासाठी उद्योगस्नेही धोरण आणले आहे. त्यामुळे राज्यात निर्मिती क्षेत्र नवे वळण घेत आहे, त्यात सकारात्मक बदल घडत आहेत. निर्मिती क्षेत्राला ऑटोमेशन, एआय व अन्य तंत्रज्ञानाद्वारे गती मिळत आहे.

ग्लोबल कॅपिबिलिटी सेंटरमध्ये देशाला व महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यासाठी व तिसऱ्या मोठ्या अर्थव्यवस्थेचे ध्येय देशासमोर ठेवले असताना हे साध्य करण्यासाठी एक्सएसआयओ सारख्या उद्योग समूहाची भूमिका महत्वाची ठरते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

येत्या काळात देशाच्या ट्रिलियन अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा असेल. त्यासाठी शासनाने रोडमॅप तयार केला आहे, यास प्रत्यक्षात आणण्यात आजच्या लॉजिस्टिक पार्कची महत्वाची भूमिका आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

एक्सएसआयओ बुद्धिमत्ता एकीकृत प्रगत औद्योगिक व निर्मिती पार्क विषयी – 

महाराष्ट्रातील औद्योगिक पायाभूत सुविधांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या या पार्कच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षेत्रात एक नवा अध्याय सुरू होणार आहे. हे पार्क ७०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून साकारले जात आहे. तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेले हे राज्यातील पहिलेच ‘इंटेलिजन्स-इंटिग्रेटेड’ औद्योगिक संकुल आहे. या प्रकल्पामुळे नागपूर आणि परिसरात सुमारे २,५०० प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *