निःस्वार्थ बुद्धीने आणि प्रामाणिकपणे देशहितासाठी केलेले कार्य संघाचेच कार्य : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत


राजकोट, १९ जानेवारी: “जेव्हा युवक विविध क्षेत्रांत देशासाठी कार्य करतात, तेव्हा त्यांच्या मनात ‘देश काय आहे’ याची स्पष्ट कल्पना असायला हवी. भूतकाळात या स्पष्ट विचारांच्या अभावामुळे किंवा ते विचार पुसट झाल्यामुळेच देश गुलाम झाला होता. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राजकोट येथील सेवा भारती भवनमध्ये सौराष्ट्र-कच्छमधील युवकांशी संवाद साधला.

ते पुढे म्हणाले, आपला देश चैतन्यमय आहे, आपण याला भारतमाता म्हणतो; हा केवळ जमिनीचा तुकडा नाही. याचे विभाजन होऊ शकत नाही, हा भावनेशी जोडलेला विषय आहे.” संघ संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी संघ स्थापनेपूर्वी केलेल्या चिंतनाचा उल्लेख करत त्यांनी संघाच्या स्थापनेची पार्श्वभूमी स्पष्ट केली. ते म्हणाले की, संघ संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याच्या ध्येयाने कार्यरत आहे.

“जसे ब्रिटनमध्ये ब्रिटिश आणि अमेरिकेत अमेरिकन राहतात, तसेच हिंदुस्थानात राहणारे ‘हिंदू’ आहेत. भारत आणि हिंदुस्थान वेगळे नाहीत, एकच आहेत. भारत हा एक स्वभाव आहे आणि हिंदू देखील एक स्वभाव आहे. मिळून-मिसळून, एकजुटीने एकत्र चालण्याचा स्वभाव म्हणजेच ‘हिंदू’ होय.”आपली भावना ‘वसुधैव कुटुंबकम’ची राहिली आहे, असे सांगताना ते म्हणाले की, “सनातन, भारतीय, इंडिक, आर्य आणि हिंदू – ही सर्व समान नावे आहेत, परंतु ‘हिंदू’ शब्द सोपा आहे आणि सहज समजतो.”

आज देशात हिंदू समाजाला आत्मविस्मृत (स्वतःची ओळख विसरायला लावणे) करण्यासाठी सुरू असलेल्या षडयंत्रांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, “हिंदू आदिकाळापासून, परंपरेने या भूमीवर राहत आहेत आणि देशाला शक्तिशाली व विकसित बनवण्याची जबाबदारी संपूर्ण समाजाची आहे. म्हणूनच, संपूर्ण हिंदू समाजाला एकत्र आणून, गुणवत्ता निर्माण करून आणि विश्वकल्याणासाठी देशाला पुढे नेण्याच्या उद्देशाने संघ निरंतर कार्य करत आहे.”

संघ शाखेच्या माध्यमातून गुणवान, श्रेष्ठ आणि निष्ठावान स्वयंसेवक तयार करतो. असे स्वयंसेवक समर्पण भावनेने समाजाच्या विविध क्षेत्रांत सेवा कार्य करतात. परंतु याव्यतिरिक्तही संघाचे कार्य आहे. केवळ ते पाहून संघाच्या कार्याचे मूल्यमापन करता येणार नाही. संघ समजून घेण्यासाठी संघातच यावे लागेल. देशाचे नशीब बदलण्यासाठी संपूर्ण समाजाची सक्रियता आवश्यक आहे आणि समाजात आचरणाचे परिवर्तनही गरजेचे आहे.असेही ते म्हणाले.

सर्वच लोक शाखेत येऊ शकत नाहीत, हे लक्षात घेऊन संघाने *’पंच परिवर्तनाचा’* विचार मांडला आहे:
१. सामाजिक समरसता
२. कुटुंब प्रबोधन
३. पर्यावरण: पाणी वाचवा, प्लास्टिक हटवा, झाडे लावा
४. स्व-बोध आणि स्वदेशी
५. नागरिक कर्तव्य

या पाच क्षेत्रांत कोणताही नागरिक लहान-मोठी कामे करून देशहितासाठी योगदान देऊ शकतो.

कार्यक्रमाच्या शेवटी युवकांनी संघ आणि देशहिताशी संबंधित प्रश्न विचारले. सरसंघचालकांनी विविध उदाहरणांसह युवकांच्या जिज्ञासांचे समाधान केले. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, “संघाला जाणून घ्यायचे असेल तर विकिपीडिया वाचू नका, संघ-साहित्य वाचा. इतरांच्या प्रचाराच्या (Propaganda) आधारावर संघ समजून घेता येणार नाही. जर तुम्ही उत्कृष्ट पद्धतीने, निःस्वार्थ बुद्धीने आणि प्रामाणिकपणे देशहिताचे कोणतेही काम करत असाल, तर संघ मानतो की तुम्ही संघाचेच काम करत आहात.”

कार्यक्रमात मातृशक्ती जागरणाचा संकल्प करण्यात आला. याप्रसंगी सौराष्ट्र प्रांताचे संघचालक मुकेशभाई मलकाण उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *