देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभे राहणार

बंदरे विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नागपूर, दि. ११ डिसेंबर : राज्याचा 720 किमी समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन 2026 पर्यंत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सभागृहातील बैठकीत दिले. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शिपयार्डसाठी विस्तृत प्रकल्प अहवाल आणि योग्य जागेची निवड तातडीने करावी. जयगड, आंग्रे, रेडी आणि विजयवाडा बंदरांच्या विकासासाठी वैभववाडी–कोल्हापूर रेल्वेमार्ग उभारणीस राज्याचा आर्थिक सहभाग निश्चित करावा. वाढवण बंदर–नाशिक महामार्गाच्या दोन्ही बाजूंवरील परिसर विकासाचे नियोजनही आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://www.facebook.com/share/p/16QRkuVeRc/

बंदर परिसरात औद्योगिक गुंतवणूक वाढवण्यासाठी एमआयडीसी आणि बंदरे विभागाच्या समन्वयाने स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. वाढवण बंदर आणि आसपासच्या मोठ्या बंदरांच्या नियोजित विकासासाठी विशेष नियोजन प्राधिकरण निर्माण करण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी पूर्णतः इलेक्ट्रिक बोटी वापरण्याचे, प्रारंभी हायब्रीड मॉडेल स्वीकारण्याचे आणि कोचीपेक्षा मोठा व आधुनिक जलवाहतूक प्रकल्प उभारण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

सध्या महाराष्ट्रातील 36 जलमार्गांवरून वर्षाला 1.80 कोटी प्रवासी प्रवास करतात. मुंबई महानगर प्रदेशातील 21 मार्गांवर 1 कोटी 60 लाख प्रवाशांची वाहतूक होते. प्रस्तावित मुंबई वॉटर मेट्रोमध्ये 21 टर्मिनल आणि 200 नॉटिकल माइल मार्ग उभारण्याच्या दृष्टीने विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *