शताब्दी वर्षात संघ सर्वस्पर्शी व्हावा : सहसरकार्यवाह अतुल लिमये

नागपूर : संघ शताब्दी वर्षात असून, संघ कार्याची आगामी दिशा काय? तर संघ सर्वस्पर्शी झाला पाहिजे, या दृष्टीने कार्य करायचे आहे. व्यक्तीनिर्माण एका दिवसात होत नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संघाच्या दृष्टीने वातावरण अनुकुल आहे, पण समाज परिवर्तनासाठी आचरण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. आचरण सुधारत नाही, तोपर्यंत परिवर्तन स्थायी राहणार नाही. आचरणातील सकारात्मक बदल तात्पुरते ठरू नयेत. परिवर्तनासाठी संस्कारांची आवश्यकता असून मोठे कार्यक्रम हे कार्यातील अडसर ठरू नयेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षानिमित्त समाज जीवनावर प्रभाव असलेल्या प्रमुख नागरिकांच्या जनसंगोष्ठीचे आयोजन नागपुरातील धरमपेठ भागाच्या वतीने करण्यात आले होते. या संगोष्ठीमध्ये अतुल लिमये यांनी ‘समाज परिवर्तनाची दिशा’ या विषयावर विचार मांडले. २६ नोव्हेंबरला संध्याकाळ चिटणवीस सेंटर पार पडलेल्या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया व धरमपेठ भाग संपर्क प्रमुख आशुतोष फडणवीस व्यासपीठावर उपस्थित होते.

शताब्दी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून समाजात सद्‍भावना निर्माण करण्याच्या दृष्टीने समाजातील विभिन्न जातीप्रमुखांची बैठकही आयोजित करण्यात येणार आहे. जेणेकरून सारा भारत समाज हितसाठी एका दिशेने कार्यरत व्हावा, असे लिमये यांनी भाषणाच्या सुरवातीला सांगितले.

संघ, भारत आणि हिंदू समाज टेकऑफच्या स्थितीत असून संघाप्रती समाजात उत्सुकता आणि आदराची भावना निर्माण झाली आहे. भारत आत्मनिर्भर आणि समृद्ध झाला आहे. स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यात हिंदूंना अभिमान वाटू लागला आहे, असे सांगत भारताची आर्थिक समृद्धी म्हणजे विकास का? असा प्रश्न लिमये यांनी उपस्थित केला. भारताचा अमेरिका होणे अपेक्षित नसून विकसित भारत घडणे महत्त्वाचे आहे, असे सांगत विकसित भारताचा मार्ग निश्चित करणे या दृष्टीने संघाची भूमिका महत्त्वाची असल्याचे लिमये म्हणाले.

भारत हा वैविध्यपूर्ण देश असून हिंदुत्वाच्या धाग्यात तो ओवलेला आहे. हा धागा तुटला तर देश निखळेल. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. समाजात अनेक समस्या असून संघटित समाजासाठी व्यक्तीनिर्माण महत्त्वाचे आहे. भारतभरात ८७ हजार शाखा आहेत. २५ हजार मासिक मीलन शाखा असल्याचे सांगत मिझोराम, नागालॅंड व काश्मीर घाटीचा अपवाद वगळता सगळ्या तालुक्यांमध्ये शाखांचा विस्तार असल्याचे लिमये यांनी सांगितले.

कार्याची निरंतर आठवण राहावी व शतप्रतिशत कार्यविस्ताराच्या दृष्टीने वाटचाल झाली पाहिजे, असे लिमये यांनी सांगितले. संघाला केवळ भौगोलिक विस्तार अपेक्षित नसून सर्वस्पर्शी विस्तार झाला पाहिजे, सध्याचा काळ संघासाठी अनुकुल असून, प्रतिकुलतेपेक्षा अनुकुलतेच्या समस्या वेगळ्या असतात, असेही त्यांनी नमूद केले. अहंकार आणि आळस त्यागून कार्य केले पाहिजे, असे ते म्हणाले.

सध्याचा काळ नॅरेटिव्ह वॉरचा आहे. गोंडी हा वेगळा धर्म आहे. लिंगायत हा वेगळा धर्म आहे, असा भ्रम समाजात पसरवला जात आहे. यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत. दक्षिण भारतात ‘कटिंग साऊथ सेमिनार’सारख्या संस्था कार्यरत होत आहेत. याला काऊंटर करण्यासाठी राष्ट्रहित जाणणारा विमर्श तयार करणे महत्त्वाचे आहे. अकॅडेमिक, इंटलेक्युअल व पॉप्युलर या तीन पातळ्यांवर नॅरेटिव्ह पसरवणे सुरू असून, याविरोधात आपली राष्ट्रीय इको सिस्टिम तयार करीत ही वैचारिक लढाई लढायची आहे. समाजाच्या प्रश्नांना उत्तर शोधताना स्वबोध महत्त्वाचा असायला हवा. रॅडिकल इस्लामला आक्रमक भाषण हे उत्तर नाही असे सांगत राजकीयदृष्ट्या वामपंथ संपला असला तरी सांस्कृतिक माध्यमातून तो कार्यरत आहे. जंगलातील नक्षलवाद संपला तरी शहरातून त्यांच्या हालचाली वाढणार आहेत. सौंदर्य प्रसाधन आणि तेलाचा बाजार काबीज करण्याचे प्रयत्न यापूर्वी झाले असून, ग्लोबल मार्केट फोर्सेस सर्वच क्षेत्रात कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

या साऱ्याला काऊंटर करण्यासाठी स्थायी व्यवस्था उभारायची आहे, हे केवळ एका संघटनेचे कार्य नाही. समाजातील सारी सज्जनशक्ती मिळून हे कार्य करू शकते. धार्मिक संस्था, मंदिरे, संप्रदाय, भजनी मंडळे, जाती व्यवसाय, सोसायटी, कॉलनी, सांस्कृतिक, कला, क्रीडा, साहित्य, योग, शिक्षण, सेवा क्षेत्र अशा साऱ्या संस्थांच्या माध्यमातून राष्ट्रीय विचारांवर एकत्रित कार्य उभे राहिले पाहिजे. समाज परिवर्तनासाठी नेटवर्किग उभे राहिले पाहिजे. धर्माधारीत व्यवस्था निर्माण व्हावी. धर्म म्हणजे पूजा व्यवस्था नव्हे. समाजातील असा आदरणीय वर्ग असे केंद्र जे समाजनीती ठरवतील, शासनालाही मार्गदर्शन करतील, तेव्हाच स्वावलंबी, समर्थ भारत निर्माण होईल, ही बाब लिमये यांनी अधोरेखित केली. आजच्या काळात परंचपरिवर्तनाचे महत्त्वही त्यांनी स्पष्ट केले.

दीप प्रज्ज्वलनाने व भारत माता पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर अनिरुद्ध देशपांडे यांचे वंदेमातरम् झाले. सूत्रसंचालन ब्रीज सारडा यांनी केले.

भाषणानंतर श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांनी अतुल लिमये यांनी समर्पक उत्तरे दिली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *