गोव्यामध्ये आजपासून भारतातील पहिल्या दीपगृह महोत्सवाचे आयोजन
केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अगुआडा किल्ला दीपगृह येथे या ऐतिहासिक महोत्सवाचे उद्घाटन करणार
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल उद्या गोव्यामध्ये पणजी येथील अगुआडा किल्ला दीपगृह येथे भारताच्या पहिल्या दीपगृह महोत्सवाचे उद्घाटन करणार आहेत. 23 ते 25 सप्टेंबर दरम्यान आयोजित करण्यात आलेला हा तीन दिवसीय महोत्सव साजरा केला जाईल. यामुळे ही ऐतिहासिक स्थळे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होतील. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे यांच्यासह इतर मान्यवर महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील. सोनोवाल यांनी यापूर्वी देशातील 75 ऐतिहासिक दीपगृहांचे पर्यटन स्थळांमध्ये रूपांतर करण्यासाठी ‘लाइटहाऊस हेरिटेज टुरिझम’ अभियान सुरु केले होते. प्रेक्षणीय स्थळे म्हणून कार्यरत होण्यासाठी ऐतिहासिक दीपगृहांचे पुरेशा सुविधांसह नूतनीकरण केले जात आहे.
Lighthouses are not only navigational aids but also heritage structures that hold immense prospects for tourism. Tomorrow, I will be joining the first Indian Lighthouse Festival to be held from September 23-25 at Aguada Fort, Goa.
Looking forward to a great visit. pic.twitter.com/AREznv0AFF
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) September 22, 2023
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले की, दीपगृहांमधील दिशा दर्शनाचे एक साधन या पलीकडील क्षमतांकडे आतापर्यंत दुर्लक्ष केले गेले. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी त्या ओळखल्या आणि त्यांना पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले. ज्यायोगे, दीपगृहे स्थानिक पर्यटन स्थळ म्हणून आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतील, आणि त्याच वेळी देशासाठी उत्पन्नाचा स्त्रोत बनतील.
हा तीन दिवसीय महोत्सव कार्निव्हलच्या स्वरुपात साजरा होणार असून, सर्वसामान्य नागरिकांना दीपगृहांकडे आकर्षित करण्यासाठी या महोत्सवात स्थानिक कलाकार, नृत्य पथके सहभागी होणार आहेत. तसेच खाद्यपदार्थांचे आणि पाककृतींचे स्टॉल, संगीत मैफिली आणि यासारख्या विविध कार्यक्रमांचा समावेश असेल.