YoFiMa शिष्यवृत्ती चा निकाल जाहीर

५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्ट फिल्म फेस्टिवल दरम्यान जळगावात होणार विशेष स्क्रीनिंग

जळगांव, दि. २ फेब्रुवारी : खान्देश मराठवाडा परिक्षेत्रातील युवकांकडे चित्रपट निर्मितीचे कौशल्य असुनही अनेकदा आर्थिक अडचणींमुळे चांगल्या चित्रकृती रसिकांपर्यंत पोचवता येत नाही म्हणून अजिंठा फिल्म सोसायटी, देवगिरी चित्र साधना द्वारा खान्देश-मराठवाडा भागातील १८ ते ३० वयोगटातील युवा चित्रकर्मींसाठी YoFiMa अर्थात Young Film Makers Fellowship योजना गतवर्षी पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. यंदा या योजनेचे दुसरे वर्ष आहे.

या योजनेत जळगाव, धुळे, नंदुरबार, छ.संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, परभणी, हिंगोली, धाराशिव, नांदेड या जिल्ह्यातील तरुणांनी मोठ्या प्रमाणावर आपल्या संहिता (स्क्रिप्ट) आयोजकांकडे जमा केल्या होत्या. तज्ञ निवड समितीने परिक्षण करुन शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत एकुण ४ युवा चित्रकर्मीची निवड केली आहे.

यात नंदू वाघमारे – जालना, सचिन दांडगे – छ.संभाजीनगर, रसिका नेवे – यावल, दिप्ती वानखेडे – नंदुरबार या युवा चित्रकर्मींची निवड झाल्याची घोषणा शिष्यवृत्ती योजनेचे अध्यक्ष तथा सुप्रसिद्ध अभिनेते, लेखक, दिग्दर्शक प्रा. योगेश सोमण यांनी नुकतीच एका कार्यक्रमात केली.

या सर्व युवा चित्रकर्मींना आपल्या कलाकृतीच्या निर्मितीसाठी रु. २५०००/- इतकी शिष्यवृत्ती रक्कम देण्यात येणार आहे. तसेच या सर्व विजेत्या लघुपटांचे विशेष प्रक्षेपण जळगाव येथे दि.२८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ दरम्यान होणाऱ्या ५ व्या आंतरराष्ट्रीय देवगिरी शॉर्टफिल्म फेस्टिवल दरम्यान चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. लघुपट निर्मिती करत असतांना या सर्व युवा चित्रकर्मींना दिग्दर्शन, संगीत, एडिटिंग, प्री- प्रोडक्शन, पोस्ट प्रोडक्शन अशा विविध विषयांवर चित्रपट क्षेत्रातील तज्ञ मान्यवरांचे मार्गदर्शन मिळणार असल्याची घोषणा अजिंठा फिल्म सोसायटीचे अध्यक्ष डॉ. जयंत शेवतेकर यांनी यावेळी केली.

YoFiMa आयोजन समितीचे डॉ. जयेंद्र लेकुरवाळे, डॉ. संजय हांडे, विनीत जोशी, डॉ. सुचित्रा लोंढे, स्वप्नील केंद्रे, किरण सोहळे यांच्यासह अजिंठा फिल्म सोसायटीच्या मान्यवर विश्वस्तांनी शिष्यवृत्ती प्राप्त विजेत्या युवा चित्रकर्मींचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *