हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी; मानवतेच्या रक्षणासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाची तेजस्वी आणि अमर गाथा!

नवी मुंबई, दि. 1 मार्च : हिंद दी चादर श्री गुरू तेग बहादुर साहिबजींनी दिलेल्या बलिदानामुळेच आज आपला धर्म व श्रद्धा टिकून राहिली आहे. त्यामुळे त्यांचा इतिहास हा महाराष्ट्रातील सर्व घरांपर्यंत पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबद्ध आहे. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या शौर्यगाथेचा समावेश शालेय अभ्यासक्रमात केला आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबई येथे ‘हिंद-दी-चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिबजी 350 वां शहीदी समागम येथे प्रमुख उपस्थिती दर्शविली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या सनातन हिंदू धर्म व संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी दिलेल्या ‘अद्वितीय बलिदाना’ची आठवण करून दिली.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानामुळे आपण आपल्या आस्थेचे रक्षण करू शकलो. या समागमच्या माध्यमातून नानकपंथी समाज व सनातन धर्मावर श्रद्धा ठेवणारे सर्व भाविक एकत्रितपणे ‘शहीदी समागम’ साजरा करतील आणि श्री गुरु तेग बहादूर साहिबजी व श्री गुरू ग्रंथ साहिब यांच्यापुढे नतमस्तक होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी 350 वां शहीदी समागम’ चा कार्यक्रम नागपूर, नांदेड आणि आज नवी मुंबई येथे होत आहे. या कार्यक्रमात नानकपंथी समाजातील शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मिकी आणि उदासी अशा आठ मोठ्या समाजांनी व जगभरातील भाविकांनी एकत्रितपणे सहभाग घेतला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाने श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यावर बंदी घातली तेव्हा लक्खी शहा बंजाराजी यांनी त्यांचे पार्थिव घरी आणून घरासकट अग्नी दिला. श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या बलिदानाने देशात अशी क्रांति निर्माण झाली की औरंगजेब कधीच यशस्वी ठरू शकला नाही.
श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ नवी मुंबई येथे त्यांच्या नावाने एक रुग्णालय उभारण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

