देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ

पुणे, दि. १४ : देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुणे येथे केले. डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, पुणे येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आयोजित “देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताह” कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर राज्याचे कृषिमंत्री माणिकरावजी कोकाटे, गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण उपाध्यक्ष तुषार पवार, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे अध्यक्ष शरद गडाख, कृषी आयुक्त सुरज मांढरे, महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण महासंचालक श्रीमती वर्षा लड्डा, सहयोगी अधिष्ठाता महानंद माने, प्रमुख शास्त्रज्ञ सोमनाथ माने, आदी कृषी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

या वेळी बोलताना पाटील म्हणाले, या उपक्रमाचे उद्दिष्ट देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती करणे हे असून, शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण, दुग्धव्यवसायाची उन्नती आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे हा यामागचा मुख्य हेतू होता. भारतातील पारंपरिक गोवंश हे केवळ दुग्धोत्पादनासाठी नसून जैविक शेतीसाठी आवश्यक असणारे शेणखत, गोमूत्र तसेच अन्य कृषिपयोगी घटक उपलब्ध करुन देतात. त्यामुळे देशी गोवंशाचे संवर्धन म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारे एक प्रभावी पाऊल आहे.


आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात देशी गोवंशाच्या वैज्ञानिक व्यवस्थापनाची आवश्यकता अधिक वाढली असून, या सप्ताहाच्या माध्यमातून युवक, शेतकरी, संशोधक व अभ्यासक यांना एकत्र येऊन विचारमंथनाची संधी मिळत आहे. अशा उपक्रमांमधून शेती क्षेत्रात नवे विचार, संशोधन व धोरणे आकार घेतील, असेल पाटील म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *