“स्वातंत्र्यात ‘स्व’ आणि ‘तंत्र’ आहे. जेव्हा ‘स्व’च्या आधारावर ‘तंत्र’ चालते, तेव्हा स्वातंत्र्य येते. भारत हा एक वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. तो जगात सुख आणि शांती आणण्यासाठी जगतो. जगाला धर्म देण्यासाठी जगतो. म्हणूनच आपल्या राष्ट्रध्वजाच्या केंद्रस्थानी धर्मचक्र आहे असे उद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उद्धृत केले. स्वातंत्र्यदिनानिमित्त, ‘उत्कल विपन्न सहायता समिती, ओडिशा’ यांच्या वतीने भुवनेश्वर येथे आयोजित कार्यक्रमात ते आज बोलत होते. याप्रसंगी त्यांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि उपस्थितांना संबोधित केले.
भागवत याप्रसंगी पुढे म्हणाले, “हा धर्म सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना जोडून, सर्वांचा विकास करतो. त्यामुळे तो इहलोकी आणि परलोकी सर्वांना सुख देणारा आहे. हा धर्म जगाला देण्यासाठी भारत आहे, हे आपले वैशिष्ट्य आहे. हे देण्यासाठी आपले तंत्रसुद्धा आपले असले पाहिजे. ते ‘स्व’च्या आधारावर चालले पाहिजे.”