अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पुणे महानगरतर्फे पुण्यात वीर नारी, वीर पत्नी व वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन
पुणे : “वीर पत्नी,वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने समाजभान ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.सैनिक सीमेवर जीवावर उदार होऊन लढत असतो त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असे उपक्रम घेतले पाहिजे,”असे प्रतिपादन पश्चिम प्रांत धर्मजागरण सहप्रमुख मिलिंद वाईकर यांनी केले.ते पुढे म्हणाले,सैनिक सीमेवर भारत मातेच्या संरक्षणासाठी लढतोय म्हणून राष्ट्र व समाज सुरक्षित आहे समाजाने पूर्व सैनिकाबद्दल आदरभाव दाखवला पाहिजे तसेच माजी सैनिकांनी समाजामध्ये सक्रिय रहावे,सामाजिक उपक्रमात सहभागी व्हावे तसेच नवयुवकांना सैन्यदला मध्ये करिअर करण्यासाठी प्रोत्साहित करावे.”
एअर व्हाइस मार्शल नितीन वैद्य (निवृत्त) यांनी ही संस्था राष्ट्रीय स्तरावर केंद्र सरकार मान्यताप्राप्त असून माजी सैनिकांसाठी,वीर नारी, वीर धर्मपत्नी यांच्या कल्याणासाठी काम करणारी असल्याचे सांगितले.एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त ) ह्यांनी अध्यक्षीय समारोप केला.कार्यक्रमास कर्नल आर आर जाधव- उपसंचालक,ब्रिगेडिअर राजेश गायकवाड,संचालक राज्य सैनिक कल्याण बोर्ड,विरेंद्र महाजनी राज्य सचिव अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद महाराष्ट्र व गोवा राज्य ह्यांची मुख्य उपस्थिती होती.
पुण्यातील धानोरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डन मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये पुणे महानगरातून मोठया संख्येने वीर माता,वीर पत्नी उपस्थित होत्या त्यांनी सर्वांना राख्या बांधल्या सर्वांनी त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला व भेटवस्तू दिल्या. सूत्र संचलन निवृत्त कॅप्टन अरविंद व जेसीओ शेषराव पाटील यांनी केले.राज्य सचिव वीरेंद्र महाजनी यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.एअर मार्शल प्रदीप बापट ( निवृत्त )यांच्या हस्ते सुरेश गोडसे व मातृशक्ती श्रीमती गर्गे यांच्या माजी सैनिकांच्या कल्याणकारी योजनांना सक्रिय मदत केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास सैन्य दलातील माजी अधिकारी,नागरिक,सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.