औरंगजेबाची कबर ताबडतोब हटवावी; विहिंप आणि बजरंग दलाची मागणी

पुणे, दि. १५ मार्च : शिवछत्रपींच्या हिंदवी स्वराज्याचा शत्रू, छत्रपती शंभू महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने तातडीने हटवावी अशी मागणी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलामार्फत करण्यात आली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आज पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन यांच्यासह दोन्ही संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

शासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास विश्व हिंदू परिषद व बजरंग दल स्वाभिमानी हिंदू समाजाला घेऊन रस्त्यावर उतरेल, मोर्चे काढेल आणि गरज पडल्यास कारसेवा करून ती कबर उखडून टाकेल असा निर्धार यावेळी दोन्ही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. औरंगजेबाची कबर आमच्या गुलामगिरीची, लाचारीची आणि हिंदूंवर झालेल्या अत्याचारांची आठवण करून देणारी आहे. त्यामुळे तातडीने ती कबर उद्ध्वस्त करण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी शासनाकडे केली.

क्रूरकर्मा औरंग्याची कबर हटाव आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर होणार आहे. तसेच पुण्यात सोमवार, दि. १७ मार्च २०२५ (फाल्गुन कृष्ण तृतीया, छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी ११:३० वाजता आंदोलन करून मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी विश्व हिंदू परिषद प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन, आणि प्रांत सह संयोजक संदेश भेगडे, श्रीपाद रामदासी उपस्थित होते.

किशोर चव्हाण म्हणाले, आपले संपूर्ण आयुष्य दगाबाजी ,विश्वासघात व हिंदू द्वेष यात घालविणारा,आपल्या सख्या भावांचे खून करणारा, बापाला कैदेत टाकणाऱ्या, काशी विश्वनाथ, मथुरा, सोमनाथ मंदिरे फोडणारा, छत्रपती संभाजी महाराज यांचा चाळीस दिवस छळ करणाऱ्या औरंगजेबाची कबर म्हणजे त्याने केलेल्या क्रूर आणि अन्यायाला प्रोत्साहन देण्यासारखे आहे, त्यामुळे कबर हटवली पाहिजे.

नितीन महाजन म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीमुळे आजही त्याच्या विचारसरणीचे अनुयायी इतिहासावर बोट ठेवून त्याच मुघल शासकाच्या पावलावर पाऊल ठेवत या हिंदुस्थानात शरिया कायद्यानुसार वागत आहेत. २०४७ पर्यंत भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या प्रवृत्तीला औरंगजेबाच्या कबरीतून प्रेरणा मिळते. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या मारेकऱ्याची कबर जतन करण्याची आवश्यकता नाही.

स्वतःच्या वडीलांना तुरुंगात टाकून मारणारा, स्वतःच्या भावांची क्रूरतेने हत्या करणारा घरातल्या लोकांना सोडत नाही त्याच्यासाठी राष्ट्रातले नागरिक व समाजाची काय किंमत असणार ? अशा राष्ट्रघातकी, क्रूर आणि हिंसाचारी प्रवृत्तीच्या औरंग्याचा करावा तितका निषेध कमी असेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *