नवी मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक व कार्यकर्ते महानंद धनाजी शेडगे यांचे मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 रोजी नवी मुंबई येथील खारघर या त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 89 होते. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क आला आणि तेव्हापासून शेवटपर्यंत ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामात क्रियाशील होते.
मुंबईतील परळ चिंचपोकळी या कम्युनिस्टांच्या बालेकिल्ला असलेल्या कामगार वस्तीमध्ये संघाचे काम करणे अतिशय जिकिरीचे होते. अशा कठीण काळात त्यांनी संघाचे काम वाढावे यासाठी तिथे मेहनत घेतली होती. शाखा मुख्य शिक्षक ते जिल्हा कार्यवाह व अनेक संघ शिक्षा वर्गामध्ये संघ शिक्षा वर्गाचे मुख्य शिक्षक या नात्याने त्यांनी जबाबदार्यांचे वहन केले होते. काही वर्षे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताच्या ग्रामविकास प्रकल्पाचेही काम सांभाळत होते.
अतिशय शारीरिक चापल्य असणारे महानंद शेडगे हे संघामध्ये ’नंदाजी’ या नावाने सुपरिचित होते. ’घाटी लेझीम’ या क्रीडा प्रकाराला संघाच्या कार्यक्रमांमध्ये लोकप्रिय करण्याचे श्रेय हे नंदाजी शेडगे यांना दिले जाते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर यांनीही नंदा शेडगे यांना त्यांच्या घरी जाऊन आशीर्वचन दिले होते.
अत्यंत सामान्य परिस्थितीत राहूनसुद्धा कोणताही खंड न पाडता आयुष्यभर संघाचे काम असामान्य धैर्याने त्यांनी केले व शेकडो संघ कार्यकर्त्यांच्या समोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला.
त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी ज्येष्ठ स्वयंसेवक आबा देसाई, काका सुर्वे, शांताराम मेस्त्री, विभाग संघचालक गुरुदास चोपडेकर, दत्ताजी शिंदे आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती.