नागपूर,ता.३. : अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी सर्व समाज एकत्रित होण्याची गरज आहे. सर्व समाज एक झाला तर समाज शक्तिशाली होईल, समाज शक्तिशाली झाला तर राष्ट्र शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले.
विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता अभियान तर्फे देवजी रावत लिखित ‘अस्पृश्यता सामाजिक विकृती समस्या और समाधान’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आणि सामाजिक समरसता यावरील परिसंवादाचे आयोजन महाल येथील गांधीसागर तलावाजवळील शिक्षक सहकारी बँकेच्या सभागहात आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर विहिंपचे कार्याध्यक्ष आलोक कुमार, भगीरथ महाराज, विहिंपचे केंद्रीय मंत्री, राष्ट्रीय प्रवक्ता तसेच अखिल भारतीय समरसता अभियान प्रमुख देवजी रावत, रा. स्व. संघाचे अखिल भारतीय समरसता गतिविधी प्रमुख श्यामप्रसाद, हिंदू बहुजन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष भय्यासाहेब विधाने, मुंबई क्षेत्रमंत्री गोविंद शेंडे, विदर्भ प्रांतमंत्री प्रशांत तितरे यांची उपस्थिती होती.
भैय्याजी जोशी म्हणाले,‘ज्या जाती बनल्या त्या देवाने बनविलेल्या नाहीत. व्यवसायानुसार जातींचा जन्म झाला. तेथूनच जन्माच्या आधारे त्या व्यक्तीची ओळख निर्माण झाली. आज निर्माण झालेल्या अनेक प्रश्नांचे मूळ तिथे आहे. वास्तविक पाहता मनुष्याची ओळख त्याच्या गुणाने होते, जन्माने नाही. आपण चामड्याच्या वस्तू बनवणाऱ्याला अस्पृश्य मानतो मग चामड्याच्या वस्तू वापरणारे श्रेष्ठ कसे. स्वच्छता कर्मचाऱ्यांना कमी लेखतो तर अस्वच्छता करणारे चांगले कसे, हा प्रश्न आपण स्वत:ला विचारायला हवा. आपण मनुष्याच्या कार्याच्या स्वरूपावरून त्याला उच्च वा नीच्च मानण्यास सुरुवात केली. ही एक विकृती असून ती दूर करण्याची गरज आहे. ही विकृती जोपर्यंत दूर करणार नाही तोपर्यंत समाज शक्तीशाली होणार नाही.’
आलोककुमार म्हणाले,‘गेल्या साठ वर्षांत विहिंपने हिंदुत्वाला केंद्रस्थानी आणत कुणीही त्याचा अपमान करू शकणार नाही, ही भावना निर्माण केली. मात्र, आजही जे हिंदू समाज संपविण्याच्या धमक्या देताहेत ते नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाहीत.’ पुस्तकाविषयी देवजी रावत यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविकपर भाषणातून गोविंद शेंडे यांनी विहिंपच्या हिरक महोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांबाबत माहिती दिली. सूत्रसंचालन संजय चौधरी यांनी केले. आभार अमोल शेंडे यांनी मानले. कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. मिलिंद माने, संजय सराफ,गोल्डी तुली, डॉ. सुधारक इंगळे आदींची उपस्थिती होती.