संघाचे प्रांत सहकार्यवाह कै. धनंजय घाटे यांना श्रद्धांजली
पुणे, दि. ८ फेब्रुवारी : कार्यकर्ता हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा आधार आहे. म्हणूनच शताब्दी वर्षातही संघ वर्धिष्णू आहे. अशा देवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या मांदियाळीत अग्रेसर असलेला धनंजय सारखा कार्यकर्ता आज हरपला आहे, अशी भावना जनकल्याण समितीचे प्रांत कार्यकारणी सदस्य विनायकराव डंबीर यांनी व्यक्त केली. एक जबाबदार, निष्ठावंत, प्रांत स्तरावरील कार्यकर्ता अकाली जाणे संघ आणि समाजाच्या दृष्टीने दुर्दैवी आहे. कारण संघाचे दैनिक काम हा धनंजय यांचा श्वास होता, असेही ते म्हणाले.
संघाचे प्रांत सहकार्यवाह कै. धनंजय घाटे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेत आयोजित सभेत विनायकराव डंबीर बोलत होते. प्रांत कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव, पुणे महानगराचे संघचालक रविंद्र वंजारवाडकर, प्रांत प्रचारक यशोवर्धन वाळिंबे यावेळी उपस्थित होते.
समाजासाठी पूर्णकालिक कार्यकर्ते देणारे घाटे कुटुंब ही राष्ट्राची संपत्ती आहे असे मत डंबीर यांनी व्यक्त केले. धनंजय घाटे यांना श्रद्धांजली अर्पण करताना ते म्हणाले, “एक स्वयंसेवक ते प्रांत सहकार्यवाह असा प्रवास असणारे धनंजय सहजतेने नव्या कार्यकर्त्यांना जोडत होते. संवाद कौशल्य आणि अंतरीच्या उमाळ्याने कार्यकर्त्याची चौकशी ते करत होते. शताब्दी वर्षात संघासमोरील आव्हाने बदलले आहे. अशा स्थितीत संघकार्यासाठी आपणही सातत्याने सक्रीय राहणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.”
मनापासून समर्पित भावनेने संघाच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणारा कार्यकर्ता गमावल्याची खंत डॉ. प्रवीण दबडघाव यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कुटुंबवत्सल, समर्पित, मितभाषी, नेमके आणि उत्तम नियोजन हा धनंजय यांचा हातखंडा होता. प्रांतात संघ शिक्षित कार्यकर्त्यांची संख्या वाढावण्याचा चंग त्यांनी बांधला होता. त्यासाठी प्रांतभर प्रवास आणि संवाद त्यानी केले. अलिकडच्या काळात संघशिक्षा वर्गांच्या वाढलेल्या संख्येमागे धनंजय याांचा सक्रिय सहभाग होता.”
लोकमान्य सायं शाखेतील घाटे यांचे बालमित्र डॉ. राहुल गोखले म्हणाले, “आमच्या शाखेतील मितभाषी कार्यकर्ता अशी धनंजयची ओळख होती. प्रचारक राहिलेल्या धनंजय हा आयुष्यात कर्तरी नाही तर कर्मणी प्रयोग करत होता. एक ध्येयवादी समर्पित कार्यकर्ता आणि अंतरिच्या उमाळयाने बोलणाऱ्या मित्राला आम्ही पारखे झालो आहोत.”
संघकाम कसे करायचे याची प्रेरणा बाबांकडून मिळाल्याची हृद्य भावना धनंजय यांचे चिरंजीव ज्ञानेश याने व्यक्त केली. तर धनंजय अवेळी, अकाली आणि त्याहीपेक्षा अकारण गेल्याचे दुःख असल्याची खंत प्रांताचे सेवाकार्य प्रमुख शैलेंद्र बोरकर यांनी व्यक्त केली. धनंजय यांचे कार्य पुढे नेऊ अशा शब्दांत अक्षय खांडेकर आणि नरेंद्र कुकडे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.