प्रा. डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांना साहित्य भारती तर्फे “जीवन गौरव पुरस्काराने“ सन्मानित करण्यात येणार

छत्रपती संभाजीनगर, दि. १४ फेब्रुवारी : अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत साहित्यभारती आणि स. भु. शिक्षण संस्थेच्या वतीने येत्या २०, २१ आणि २२ फेब्रुवारी रोजी साहित्य उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्योत्सवात विविध विषयांवर चर्चासत्रे, कवीसंमेलन, नाट्यछटा सादरीकरण असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत. या साहित्योत्सवात मराठीतील ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांना “साहित्यभारती जीवनगौरव” पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती या उत्सवाचे स्वागताध्यक्ष मंत्री अतुल सावे यांनी काल एका पत्रपरिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला स. भु. शिक्षण संस्थेचे सरचिटणीस डॉ. श्रीरंग देशपांडे, प्रदेश कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी, महामंत्री प्रा. डॉ. पृथ्वीराज तौर, निमंत्रक प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, कार्यवाह आर्कि. डॉ. अनिरूद्ध नाईक, कार्याध्यक्ष डॉ. विकास कापरे हे उपस्थित होते.
“जागर प्रतिभेचा, युवा मनाचा” ही थीम महोत्सवाची राहणार असून, राज्यातील युवक मोठ्या प्रमाणात महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. दि. २० (शुक्रवार) रोजी दुपारी चार वाजता ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, प्रा. डॉ. ऋषिकेश कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सुरू होणारी ही दिंडी पैठण गेट, शिरावा बाजारमार्गे स. भु. परिसरात पोहचेल. या ग्रंथदिंडीत भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या विविध पथकांचा समावेश राहणार आहे. सायंकाळी ७ ते ९ या वेळेत श्रीकांत उमरीकर लिखित “गोदेचा हा वसा, शब्दांचा हा वारसा” हा मराठी कविता अभंग, ओवी, स्तोत्र यावर आधारित कार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे, असे सावे यांनी सांगितले.
या साहित्योत्सवात होणारे कार्यक्रम असे :
– शनिवार दि २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता स. भु. परिसरात ग्रंथ प्रदर्शनी, भाषा वैभव प्रदर्शनी, गड किल्ले प्रदर्शनी, सेल्फी पाँइंट आदीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.
– दहा वाजता सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक अभिराम भडमकर यांच्या हस्ते साहित्योत्सवाचे उद्घाटन होईल.
– या वेळी स. भु. संस्थेचे अध्यक्ष ॲड. दिनेश वकील, साहित्य अकादमीचे सदस्य प्रा. नरेंद्र पाठक, सुप्रसिद्ध कवी देवीदास फुलारी, साहित्योत्सवाचे कार्याध्यक्ष डॉ. विकास कापरे, प्रदेशाध्यक्ष प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, प्रदेश कार्याध्यक्ष शशिकांत घासकडबी, प्रांताध्यक्ष प्राचार्य संजीव गिरासे, प्रांत कार्याध्यक्ष उमेश काळे, निमंत्रक प्रा. डॉ. सर्जेराव जिगे, कार्यवाह डॉ. आर्कि. अनिरुद्ध नाईक उपस्थित राहणार आहेत.
विविध विषयांवर चर्चासत्रे :
– उद्घाटन समारंभानंतर “राष्ट्र उभारणीत सकस साहित्याचे योगदान” या विषयावर इंद्रजित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. प्रा. बळीराम गायकवाड, प्रा. प्रदीप ढवळ, आशिष मालसे त्यात सहभागी होतील.
– नाट्यछटा सादरीकरण आणि त्यावरील चर्चेत अभिराम भडकमकर, राजकुमार येल्लावाड, प्रा. जयंत शेवतेकर यांचा सहभाग राहणार असून, , राजश्री पोहेकर, सुजाता पाठक, अवंती कुलकर्णी व पारितोषिक विजेते कलाकार सादरीकरण करणार आहेत.
– “२१ व्या शतकातील स्त्री साहित्यिकांची अभिव्यक्ती” या विषयावर मीरा निचले, माहेश्वरी गावित, प्रा. सुनिता सांगोळे, मीनल वसमतकर यांच्या उपस्थितीत परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री “महाराष्ट्राची लोकधारा” हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
अभिरूप न्यायालय, कवीसंमेलन :
– दि. २२ रोजी सकाळी “समाज माध्यमावरची अभिव्यक्ती” हा परिसंवाद होणार असून, त्यात निकिता भागवत,विनोद जैतमहल, मोहिनी मोडक, प्रीतम निकम, तुषार दामगुडे आदी सहभागी होणार आहेत.
– “वाचनाने आम्हाला काय दिले?” या विषयावरील परिसंवादात प्रा. डॉ.पृथ्वीराज तौर, समीरा गुजर, सरदार जाधव, मधुरा वेलणकर, मनोहर शिरसाठ सहभागी होतील.
– दुपारी ११ ते १ वाजेपर्यंत निमंत्रित आणि पारितोषिक विजेते कवींचे संमेलन होणार आहे. अभिरूप न्यायालयाचा एक कार्यक्रम होणार असून, आजची भाषा इन्स्टाग्राम, “रिल्स आणि कविता – विरोध की संधी?” हा त्याचा विषय आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष्यस्थानी न्या. अंबादासराव जोशी राहणार असून, शिव कदम, मुरहरी केळे, प्रा. दिलीप बिरुटे, भारत अमदापुरे यांचा त्यात सहभाग असेल.
– “हातात विश्व, मनात प्रश्न : आजचे युवा साहित्य कुठे चालले आहे?” हा परिसंवाद प्रा. रवींद्र बेंबरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, शशिकांत घासकडबी, रेखा ढेरे, विजय लोहारे, अरुण ठोके यांचा त्यात सहभाग राहणार आहे.
प्रा. कवठेकरांचा सन्मान :
समारोप सत्रात दुपारी ४.३० वाजता मराठीतील ख्यातनाम समीक्षक प्रा. डॉ. बाळकृष्ण कवठेकर यांना साहित्य भारती तर्फे “जीवन गौरव पुरस्काराने“ सन्मानित करण्यात येणार आहे. सन्मानपत्र, २१००० रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. समारोपाचे भाषण प्रा. कवठेकर करणार आहेत. या कार्यक्रमाला अ. भा. साहित्य परिषदेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दिनेश प्रतापसिंह, प्रदेश संघटन मंत्री नितीन केळकर, उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉ. पंकजा वाघमारे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. .

