’व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रतिपादन
पुणे, १९ डिसेंबर : भारताची फाळणी ही जगाच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी देशाच्या एकता व एकात्मतेबाबत कोणताही गोंधळ असता कमा नये, ही गोष्ट सर्व धर्माच्या व सर्व विचारसरणीच्या लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. इतिहासाचे विस्मरण झालेल्यांना पुन्हा पुन्हा इतिहास सांगावा लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी मंगळवारी केले.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालय मैदानावर आयोजित राष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनाच्या निमित्ताने भारतीय विचार साधना प्रकाशित आणि डॉ. गिरीश आफळे लिखित ’व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ या पुस्तकाचे प्रकाशन आंबेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
प्रसिद्ध लेखक आणि विचारवंत प्रशांत पोळ, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक प्रा . डॉ. केदार नाईक, ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे आणि भाविसाचे कार्यवाह राजन ढवळीकर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
या प्रसंगी आंबेकर म्हणाले, “आपल्याकडे इतिहासाच्या संदर्भात खूप संभ्रम निर्माण करण्यात आला आहे. इतिहासाच्या या दुविधेतून बाहेर निघण्याची गरज आहे. हे राष्ट्रकार्य आहे आणि ते अत्यंत आवश्यक आहे. या देशाची फाळणी ही जगाच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. ती बाहेरून येणाऱ्यांनी नव्हे तर इथल्याच लोकांनी केली, ही मोठी खंत आहे. ही घटना आपण कधी विसरू नये आणि विसरू देऊ नये. फाळणीशी संबंधित अनेक गोष्टी माहीत नसल्यामुळे आजही अनेक लोक संभ्रमात पडतात. या संभ्रमाचे परिणाम तेव्हाही भोगावे लागले आणि आजही भोगावे लागतात.”
ते पुढे म्हणाले की राष्ट्राच्या कल्पना मसिहा किंवा विचारांच्या आधारे निर्माण होत नाहीत. राष्ट्राच्या कल्पना हजारो वर्षांच्या साधनेतून घडतात. देशाच्या एकता व एकात्मतेबाबत कोणताही गोंधळ असता कमा नये. ही गोष्ट सर्व धर्माच्या व सर्व विचारसरणीच्या लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. इतिहासाचे विस्मरण झालेल्यांना पुन्हा पुन्हा इतिहास सांगावा लागेल.
यावेळी पुस्तकाचे लेखक डॉ. गिरीश आफळे म्हणाले, “स्वातंत्र्यलढ्यात स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मात्र स्वातंत्र्यानंतर आलेल्या सत्ताधाऱ्यांनी हा इतिहास दडपून टाकला. तो दडपलेला इतिहास बाहेर काढण्यासाठी हे पुस्तक लिहिले आहे.”
’भारताची फाळणी अटळ नव्हती’
’फाळणी, भारत. आणि भवितव्य’ या विषयावर या प्रसंगी एक परिसंवाद घेण्यात आला. प्रतिभा रानडे, प्रशांत पोळ आणि केदार नाईक यांनी यात सहभाग घेतला. प्रसाद फाटक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. भारताची फाळणी अटळ नव्हती, मात्र तत्कालीन नेतृत्वाच्या चुकांमुळे फाळणी झाली. या फाळणीमुळे कोणाचेही भले नाही, असे मत यावेळी वक्त्यांनी व्यक्त केले.