‘राजमाता जिजाऊ’ नावाने 3000 बसेस एसटीच्या सेवेत दाखल

मुंबई, दि. 24 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 3000 ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेसचे लोकार्पण केले. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करण्याची भावना आहे. एसटी बससेवेची नामकरणाची गौरवशाली परंपरा असून, यापूर्वीही शिवनेरी, शिवशाही, शिवाई, यशवंती आणि हिरकणी अशा ऐतिहासिक नावांमुळे बसेसना एक वेगळी ओळख मिळाली आहे असे फडणवीस यावेळी बोलताना म्हणाले.

या अत्याधुनिक बसेसमध्ये 3×2 आसन रचना असलेली 56 आसने असून, यामुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. सुरक्षेच्या दृष्टीने या बसेसमध्ये 4 सीसीटीव्ही कॅमेरे, जीपीएस यंत्रणा, पॅनिक बटन आणि इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक बसवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या बसेस दोन शहरांदरम्यानच्या वर्दळीच्या मार्गांवर ‘शटल सेवा’ म्हणून चालवण्यात येणार आहेत.
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलताना म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या ३००० बसेस आजपासून महामंडळाच्या सेवेत दाखल होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या या बसमुळे प्रवाशांना अधिक सुलभ, सुरक्षित, आरामदायक आणि जलद प्रवास करता येणे शक्य होणार आहे.

